मनपाच्या सायकल एक्स्पोमध्ये लकी ड्रॉ

नागपूर : ‘जागतिक सायकल दिना’च्या निमित्ताने ३ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजता नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील सायकलपटूंच्या सहकार्याने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या अनुषंगाने गुरूवारी १ जून २०२३ रोजी यशवंत स्टेडियम येथे सायकल एक्स्पोचे आयोजन करण्यात येणार आहे. या एक्स्पोमध्ये सहभागी होणा-यांकरिता विशेष लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. लकी ड्रॉ मधील दोन भाग्यवंतांना दो न गँग व्हीएक्स सायकल जिंकण्याची संधी आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध सायकलपटूंच्या सहकार्याने ३ जून रोजी सायकल दिनी मनपा मुख्यालयातून सायकल रॅलीचा शुभारंभ होईल. शहरात सायकलप्रति जनजागृती निर्माण व्हावी व नागरिकांनी आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सायकलचा उपयोग करावा या हेतूने सायकल आणि सायकलशी संबंधित उपकरणांची माहिती देणारे खास सायकल एक्स्पो १ जून रोजी यशवंत स्टेडियम येथे सकाळी ७.३० वाजतापासून सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

या एक्स्पोमध्ये सहभागी होणा-या नागरिकांकरिता चिप सायकल स्टोअर्स (Cheap Cycle Stores) तर्फे लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे. ३ जून रोजी सायकल रॅलीच्या दिवशी या लकी ड्रॉ ची सोडत निघेल. सोडतीमध्ये पहिल्या दोन विजेत्यांना चिप सायकल स्टोअर्सतर्फे गँग व्हीएक्स ही सायकल प्रदान करण्यात येईल.

नागपूरकरांमध्ये सायकलिंगबाबत जनजागृती निर्माण व्हावी व जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा, या उद्देशाने या एक्स्पोचे मनपाद्वारे आयोजन करण्यात येत आहे. या एक्स्पोच्या ठिकाणी सायकल रॅलीकरिता नोंदणी केलेल्या सहभागींना टी-शर्ट देखील प्रदान करण्यात येणार आहे. सायकल एक्स्पोमध्ये शहरातील विविध सायकल विक्रेते, सायकलिंगशी संबंधीत साहित्यांचे उत्पादक आणि विक्रेते आदींनी मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शविण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

विशेष म्हणजे सायकल एक्स्पोमध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या सायकल तसेच सायकलिंग करताना आवश्यक साहित्य आदी सर्वांची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी प्राप्त होणार आहे.

अधिकाधिक संख्येने सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरोग्य आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करणा-या नागपूर महानगरपालिकेद्वारे आयोजित सायकल रॅलीमध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

सायकल रॅली हा अत्यंत स्तूत्य उपक्रम असून या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आयोजकांना शुभेच्छा दिल्या आहेत. सायकलच्या वापराने इंधनाची बचत होते. सायकलमुळे पर्यावरणाचे रक्षण तर होतेच शिवाय आरोग्यासाठी देखील ते हितकारक आहे. तसेच पर्यावरण रक्षणाला चालणा देणारे आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

नोंदणीला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

३ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजता नागपूर महानगरपालिका मुख्यालय, सिव्हिल लाईन्स येथून सुरू होणा-या १६ किमीच्या सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाईन नोंदणीला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी मनपाच्या अधिकृत www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरील ‘World Bicycle Day Rally Registration Form’ यावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून नि:शुल्क नोंदणी करता येईल. इच्छूकांनी ३१ मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी झालेल्या सहभागींना मनपातर्फे टी-शर्ट दिली जाणार आहे. या टी-शर्ट एक्स्पोच्या स्थळी यशवंत स्टेडियम येथेच सहभागींना प्रदान करण्यात येणार आहेत.