गुलाब पुष्प वर्षाव करीत शिक्षकांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत; ‘प्रवेशोत्सवाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर : शाळेचा पहिला दिवस हा सर्वांसाठीच अविस्मरणीय असतो, शालेय जीवनात मिळालेली शिकवण ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यथोचित मदत करीत असते. अशातच विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेचा पहिला दिवस नेहमी स्मरणात राहावा, विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची हुरहूर लागावी, आनंददायी शिक्षणातून शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या १३५ शाळांमध्ये शाळेचा पहिला दिवस ‘प्रवेशोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. प्रवेशोत्सव निमित्त शिक्षकांनी गुलाब पुष्प वर्षाव करीत उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

‘प्रवेशोत्सवाचा’ मुख्य कार्यक्रम देवनगर परिसरातील विवेकानंद नगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात नागपूर महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पुसेकर, उपशिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, लक्ष्मीनगर झोनच्या शाळा निरीक्षक अश्विनी फेट्टेवार, विवेकानंद नगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजकुमार बोबाटे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. मनपाचे शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पुसेकर यांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.

पाहिल्या दिवशी नियमित प्रार्थनेने शाळेची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबाचे पुष्प भेट देण्यात आले. तसेच वर्गात प्रवेश करतांना विद्यार्थ्यांवर गुलाब पुष्पचा वर्षाव करण्यात आला. याशिवाय शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि गणवेश देण्यात आले. तर इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि जे. के. जी ते के. जी. २ च्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तक आणि गणवेश व शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात आला. गणवेश आणि शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.