संसद भवनात पत्रकार गॅलरीशिवाय इतर ठिकाणी आता पत्रकारांना नो एंट्री!

Anant Gadgil
Anant Gadgil

काँग्रेस प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांचा आरोप

नागपूर (Nagpur) : केंद्रात भाजप (BJP) सरकार आल्यापासून पत्रकारांना स्वातंत्र्य देण्याऐवजी पद्धतशीरपणे त्यांच्यावर बंधने लादण्यात येत आहेत, असा आरोप काँग्रेस (Congress) प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ (Anant Gadgil) यांनी केला आहे. भाजपला सातत्याने विरोध करतात म्हणून गेल्या ३-४ वर्षात दिल्लीतील तसेच महाराष्ट्रातील टीव्ही चॅनेलच्या प्रसिध्द संपादकांचे राजीनामे घेण्यात आले.

संसद भवनात पत्रकार गॅलरीशिवाय इतर ठिकाणी आता पत्रकारांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. संसदेत पत्रकार म्हणून अनेक वर्षे काम केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांना निवृतीनंतर पूर्वी विशेष पास दिला जायचा. तोही बंद करण्यात आला आहे. निर्भिडपणा दाखविणाऱ्या चॅनेलची मालकीच बदलण्यात आली.

आता तर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी आपल्या वक्तव्यातून पत्रकारांची प्रतिमा पार धाब्यावर बसवली आहे. हेच काँग्रेसच्या राजवटीत झाले असते तर अग्रलेखांनी पेपर भरून गेले असते. एवढे सारे होऊनही पत्रकार गप्प का? किती पत्रकारांनी याविरूद्ध आवाज उठविला, सवालही गाडगीळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.