आरटीई रकमेची परिपूर्ती तातडीने करा; आम आदमी पार्टीचे आंदोलन

गरीब मुलांना शाळा शिकू द्या!

चंद्रपूर : मागील चार वर्षापासून आरटीई अंतर्गत शिक्षण देणाऱ्या शाळांचे अठराशे कोटी रुपये सरकारने देणे आहे. त्यामुळे गरीब वंचित घरातील मुलांना शैक्षणिक फटका बसत आहे. या विषयाला घेवून आज आम आदमी पार्टीने जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे तसेच शहर अध्यक्ष योगेश गोखरे यांच्या नेतृत्वात जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

‘एकीकडे राजकीय नेते मंडळीच्या मुलांचे शिक्षण पंचतारांकित शाळात किंवा परदेशात चालू आहे. परंतु सरकार गरीब , वंचित घरातील मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी मात्र निधी नाही, अशी टिका आप चे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केली.

महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांची एक लाख मुले दरवर्षी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश घेतात. आता २२-२३ शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, शासनाकडून गेल्या चार वर्षातील सुमारे अठराशे कोटी रुपये एवढी रक्कम शासनाने शाळांना न दिल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा अडचणीत आल्या आहेत. दरवर्षी शासन दिरंगाई करीत असल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते आहे. यंदा पुन्हा तशीच वेळ आली आहे ,असा आरोप यावेळेस शहर अध्यक्ष योगेश गोखरे यांनी केला.

फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेत राज्य करणाऱ्या शासन दरबारी मुलांना मात्र न्याय मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. संविधानाने दिलेल्या शिक्षण हक्काची पायमल्ली होते आहे असे आम आदमी पार्टी ने केले.

शासनाने या शाळांची थकीत शैक्षणिक शुल्क रक्कम आठ दिवसात अदा करावी व लाखो मुलांचे शिक्षण चालू ठेवावे अशी आम आदमी पार्टी मागणी करीत आहे. अन्यथा आम आदमी पार्टी राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशारा या वेळेस देण्यात आला.

आजच्या निदर्शनात सुनील देवराव मुसळे संतोष दोरखंडे , भिवराज सोनी ,मयूर राईकवार दीपक भाऊ बेरशेट्टीवार , सुनिताताई पाटील , योगेश गोखरे, राजूभाऊ कुडे, रहमान पठाण, देवेंद्र अहेर, सुधीर पाटील, संतोष बोपचे, जास्मिन शेख तब्बसूम शेख, सुनील चौधरी, लक्ष्मण पाटील, नौरतम शाहू, प्रदीप वाळके, रवी पपुलवार, नागेश्वर गंडलेवार, कविता टिपले, कल्पना सोनटक्के, कुंदाताई, मंगलाताई, मुंगले ताई, राणी बोरा, अनुप तेलतुंबडे, वंदना कुंदावार, हर्षवर्धन बोरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.