अर्थव्यवस्थेत जागरूकता आणण्यासाठी सर्क्युलर इकॉनॉम कॅम्पेनचे आयोजन

चंद्रपूर : खाण व पोलाद मंत्रालय, जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट आणि डिझाइन सेंटर (जेएनएआरडीडीसी) नागपूर, नाल्को, एनएमडीसी, एमएसटीसी आणि एमआरएआय यांच्या सहकार्याने अर्थव्यवस्था मोहिमेची मालिका आयोजित करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत पर्यावरणासाठी टिकाऊपणा व जीवनशैलीवर हा कार्यक्रम आधारित आहे. मेटल क्षेत्रातील वर्तुळाकार अर्थव्यवस्थेत जागरूकता आणण्यासाठी, जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट आणि डिझाइन सेंटर, विदर्भातील 11 जिल्ह्यातील 22 शाळांमध्ये जागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. चंद्रपुर येथे सर्क्युलर इकॉनॉमी कॅम्पेन-2023 चे आयोजन नियोजन भवन येथे करण्यात आले होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, प्रशासन अधिकारी श्रीमती विशाखा, डॉ. भुक्ते, डॉ. सुचिता रॉय तसेच शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, बोर्डा व भवानजीभाई चव्हाण हायस्कुल येथील विद्यार्थी व विद्यार्थीनीची प्रामुख्याने उपस्थिती होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी, पूर आणि दुष्काळाच्या स्वरुपात भारताला भेडसावत असलेल्या हवामान बदलाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी संसाधन कार्यक्षमता वाढवणे आणि पुन:निर्वीनीकरण सामग्रीच्या वापरास प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली. विद्यार्थी देशाचे भविष्य असून उद्याची नवीन पिढी आहे. त्यामुळे विकास, पर्यावरण संवर्धनाबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

प्लास्टिकच्या बहुतांश  वस्तू आपण कचऱ्यात फेकून देतो. त्याचा परिणाम पर्यावरणाच्या प्रदुषणावर होतो. त्यासोबतच भारतात दरवर्षी  सुमारे 2 मिलीयन टन वेस्ट प्लास्टिक कचरा निर्माण होतो. त्यापैकी केवळ 40 टक्के कचऱ्याचे संकलन होऊन त्यावर प्रक्रिया केली जाते. नागरीकांनी प्लास्टीक कचरा इतरत्र फेकू नये, कचऱ्याचे वर्गीकरण करुन सदर कचरा ग्रामपंचायत व महानगरपालिकेला द्यावा. कचऱ्यापासून  होणारे फायदे व दुष्परीणाम काय होतात याबाबत विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातुन समजून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम. म्हणाले, निरुपयोगी वस्तुंचा वापर झाल्यास त्या वस्तु फेकुन दिल्या जातात. मात्र, त्या वस्तुचे रिसायकलींग करुन त्यापासून टिकाऊ वस्तु तयार केल्या जातात. भविष्यात अशाप्रकारे तयार केलेल्या वस्तु मोठया प्रमाणात उपयोगात आणाव्या लागतील. या सर्क्युलर इकॉनॉमी कॅम्पेनच्या माध्यमातुन लहान मुलांमध्ये जनजागृती करण्याच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमात भवानजीभाई चव्हाण हायस्कूल व शासकिय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, बोर्डा येथील 330 विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वोत्कृष्ट पाच प्रदर्शन आणि रेखाचित्रांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन आर विशाखा यांनी केले.