पूर व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या; मुनगंटीवार यांचे आवाहन

सुधीर मुनगंटीवार यांचे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन

चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातले आहे. पाऊस आणि पुरामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची मोठी वाताहत झाली असून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

अतिवृष्टीमुळे ज्यांच्या शेतीचे व घरांचे नुकसान झाले त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाला निर्देश दिले आहेत. यासंदर्भात दोनवेळा आढावा बैठक घेऊन कार्यवाहीची माहिती घेण्यासाठी ते सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. प्रशासनासोबत आपणही लोकसेवक म्हणून मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे, असे मुनगंटीवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना म्हटले आहे.

पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांच्या मदत व पुनर्वसन कार्यात भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून मदत करावी. पूरग्रस्तांना अन्न, वस्त्र व निवाऱ्याची कमतरता भासू नये, याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असेही आवाहन मुनगंटीवार यांनी केले आहे. शासनातर्फे नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यात येत आहेत. पूरग्रस्तांना मदतही करण्यात येत आहे. या सर्व कामात भाजपच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे. शासन व प्रशासकीय यंत्रणा आपले काम करीत आहे, परंतु भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपतग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.