कृषी केंद्रधारकांना कृषी विद्यापीठाची दैनंदिनी ठेवणे बंधनकारक

कृषी विद्यापीठाच्या दैनंदिनीतील शिफारशीनुसारच शेतकऱ्यांना खते, बियाणे व किटकनाशके वापराबाबत कृषी केंद्रानी सल्ला द्यावा

चंद्रपूर : जिल्हयातील सर्व कृषी केंद्रधारकांना कृषी विद्यापीठाची दैनंदिनी ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. कृषी विद्यापीठाच्या दैनंदिनीचा अभ्यास करून शेतक-यांना खते, बियाणे व किटकनाशके कसे व किती वापरावे याबाबत मार्गदर्शन करावे. पिकावर किडीच्या तीव्रतेनुसार औषधाची फवारणी करावी. अगोदर जैविक, बायोलॉजीकल नंतर किडीची नुकसानीची पातळी किती आहे. यावरून हिरवा, निळा, पिवळा व लाल चिन्ह असलेली औषधी फवारणीबाबत मार्गदर्शन करावे.

कृषी शास्त्रज्ञांनच्या अहवालानुसार गरज नसतांना शेतक-यांना अनावश्यक किटकनाशके दिल्या जात असल्यामुळे शेतक-यांचा उत्पादनाचा खर्च वाढून निव्वळ उत्पन्न कमी होत आहे. तसेच रासायनिक औषधाच्या जास्त वापरामुळे पिकासाठी उपयुक्त असे जिवजंतू व मित्र किडीची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे कृषी विदयापिठाच्या दैनंदिनीमधील शिफारसीनुसार खते, बियाणे व औषधी दिल्यास शेतक-यांचा उत्पादनाचा खर्च कमी होवून निव्वळ उत्पन्न वाढेल व पर्यावरणाचे होणारे नुकसान कमी होवून त्याचा समतोल साधला जाईल.

जिल्हयात रासायनिक किटकनाशकाच्या अनावश्यक व अतीवापरामुळे रू. 100 पेक्षा ज्यादा कोटीची गरज नसतांना किटकनाशके वापरली जातात. रासायनिक किटकनाशकाऐवजी, जैविक किटकनाशकांचा वापर केला तर मित्र किडीची संख्या वाढून पर्यावरण सुधारेल. त्यामुळे कृषीकेंद्रानी जैविक निविष्ठा ठेवणे गरजेचे आहे. तसेच बियाणे खरेदीच्या वेळी शेतक-यांना बियाणे उगवणक्षमतेचे प्रात्यक्षिके दाखवण्यात यावी.

यावरून बियाण्याची उगवणक्षमता किती आली हे लक्षात येते. 100 दाण्यापैकी सरासरी 70 किंवा त्यापेक्षा जास्त उगवणक्षमता आलेले बियाणे शेतक-यांनी पेरणी करावे. याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे. कृषी विद्यापीठाच्या दैनंदिनीनुसार खते, बियाणे व औषधे कृषीकेंद्र धारकांनी शेतकऱ्यांना दयावी. तसे न केल्यास कृषीकेंद्राचे परवाने रद्द करण्यात येईल. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी कळविले आहे.