पत्रकारांनी लोकमान्य टिळकांप्रमाणे जनहितार्थ लिखाणावर भर द्यावा : संजय पुरंदरे

विदर्भ सेवा समितीच्या कार्यक्रमात एसीबीचे अतिरिक्त अधीक्षक पुरंदरे यांचे प्रतिपादन 

नागपूर : समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्यांना वाचा फोडीत त्या समस्यांप्रती शासन, प्रशासनाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत असते, म्हणूनच माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. लेखणीच्या बळावर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, प्रखर पत्रकार, भारताचे थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यापासून आजच्या पत्रकारांनी प्रेरणा घेऊन आपले कर्तव्य बजावले पाहिजे. पत्रकारांनी त्यांच्याप्रमाणे जनहितार्थ लिखाणावर भर द्यायला हवा असे प्रतिपादन नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे यांनी केले.
विदर्भ सेवा समितीतर्फे आयोजित लोकमान्य टिळक जयंती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमात सध्या प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले माजी पत्रकारांनाच सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी नागपूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी नागपूरचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, महावितरण नागपूरचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर, महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी श्री. अखिलेश हळवे, ओसीडब्ल्यूचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रावेकर, भारतीय माहिती सेवेचे वरिष्ठ अधिकारी आणि सीबीसी वर्धाचे फील्ड पब्लिसिटी अधिकारी हंसराज राऊत, भारतीय जनसंपर्क सेवेत नुकतीच निवड झालेले पत्रकार सौरभ खेकडे यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय नागपूरचे रहिवासी असलेले आणि सध्या कॅनडात शिक्षण घेत असलेले ओम बदियानी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्तींचे प्रतिनिधी म्हणून नागपूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी नागपूरचे जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपण अनेकदा ऐकतो की, एखाद्या पोलीस अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी यांनी आपल्या कर्तव्यात चूक केली. परंतु, असे नसते. अधिकाऱ्यांची एक नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामागे चित्रपटांमधील पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांची भूमिका नकारात्मक पद्धतीने पुढे ठेवण्याचा हा परिणाम आहे. प्रशासकीय स्तरावर अनेक नियम आणि प्रक्रिया पाळून काम केले जाते, त्यामुळे कधी-कधी विलंब होतो. समाजात बदल घडवून आणण्याची जबाबदारी जितकी प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे, तितकीच जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडणे हे जनतेचे कर्तव्य आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा न पसरवणे, प्लास्टिक बंदीचे पालन करणे, अशा लहानापासून मोठ्या जबाबदाऱ्यांचाही समावेश होतो.
तसेच सौरभ खेकडे यांनी सांगितले की, मी मागील 8 वर्षे पत्रकारिता करताना असतांना जनहिताचे अनेक प्रश्न समोर आणले. समाजात सकारात्मक बदल घडवून जनहितासाठी काम करणे हा त्यामागचा उद्देश होता. आता प्रशासकीय सेवेत पाऊल ठेवताना त्यांच्यासाठी जनहित सर्वोपरि असेल.असेही श्री. खेकडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत  विदर्भ सेवा समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार आनंद निर्बाण म्हणाले की, पत्रकारिता करणारा माणूस आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात गेला तरी त्यातील पत्रकार सदैव जिवंत राहतो. पत्रकारिता क्षेत्र असो की, प्रशासकीय सेवा, दोन्हीही थेट जनतेशी संबंधित आहेत. पत्रकार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जनहित डोळ्यासमोर ठेवून काम केले तर समाजाची प्रगती झपाट्याने होऊ शकते.
कार्यक्रमात प्रामुख्याने विदर्भ सेवा समितीचे कार्याध्यक्ष डॉ.संतोष मोदी, सर्वश्री सचिव अशोक आर.गोयल, प्रमोद शुक्ला, संजय पांडे, आशु पांडे, सुनील तिवारी, मधुदुसन घुमरे, संजय जुमळे, बाबू भाई पटेल पाटीदार, संजय दोशी, द्वारकासिंग आशिया, किशोर बावनकर, अभिषेक तिवारी, पूजा सौरभ खेकडे,श्वेता राऊत, पराग नागपूरकर,लक्ष्मीकांत काकडे, मयूर केवलिया, बंडू धर्मथेक, मनोज बंड, प्रदीप साहनी, मणिकांत गाडेकर, प्रशांत मानेकर जैन आदी उपस्थित होते.