गडचिरोलीच्या तरुणीचे परदेशी शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण.

किरण रमेश कुर्मा
किरण रमेश कुर्मा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीमुळे ब्रिटनला झाली रवाना.

गडचिरोली (Gadchiroli) : ‘स्वप्न साकार हाेत नाहीत ताेपर्यंत स्वप्न पाहात राहा’, लिंक्डइन प्लॅटफॉर्मवर किरण रमेश कुर्माच्या प्रोफाइलमध्ये ही ओळ वर दिसते. गडचिरोलीतील पहिली महिला वाहन चालक असलेल्या किरण कुर्माने मोठी स्वप्ने पाहण्याचा व त्यांचा पाठपुरावा करण्याचा दृढनिश्चय केला होता. 19 सप्टेंबर रोजी गणेशाचे आगमन झाल्यानंतर 20 सप्टेंबर रोजी तिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेली 40 लाखांची शिष्यवृत्ती मिळाली. तिने 5 दिवसात मिळणारा व्हिसा काढला आणि थेट इंग्लंड गाठले. तेथून “दिव्य मराठी’शी बोलताना किरण कुर्माने आपल्याला गणपती बाप्पा पावल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांनी जाहीर केलेली 40 लाखांची शिष्यवृत्ती 5 सप्टेंबरपर्यत मिळाली नाही तर किरणने पाहिलेली स्वप्ने गडचिरोलीच्या रस्त्यावरील धुळीत मिसळण्याची भीती होती. गडचिरोली जिल्ह्यातील माओवादग्रस्त भागातील सर्वात तरुण महिला टॅक्सी ड्रायव्हर होण्यापासून ते एक उद्योजक होण्यापर्यंतचा प्रवास तिने अपार कष्टातून साध्य केला आहे. उद्योजक होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून महाराष्ट्र सरकारने तिला सुमारे 40 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. या मदतीच्या बळावर किरण युनायटेड किंगडममधील लीड्स विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विपणन व्यवस्थापन अभ्यासक्रम शिकण्यासाठी रवाना झाली.

खडतर स्थितीत शिक्षण पूर्ण

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील रेगुंठा येथील किरण कुर्मा ही एक यशस्वी तरुणी म्हणून समोर आली. रेगुंठा येथे दहावीपर्यंत शालेय शिक्षण घेतल्यानंतर किरणला 12 वीचे शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जावे लागले. त्यानंतर कॉलेजमध्ये शिकण्यासाठी हैदराबाद गाठावे लागले. तिने उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात एमए पूर्ण केले. कारण, आमच्या भागात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध नाहीत, असे किरणने सांगितले.

मुख्यमंत्री शिंदेंमुळे शिष्यवृत्ती वेळेत मिळाली

फेब्रुवारी 2023 मध्ये तिने टॅक्सी चालवणे सोडले. कारण, तिला तिच्या स्वप्नांचा पाठपुरावा करायचा होता. यादरम्यान मी उद्योजकतेमध्येही नशीब आजमावले. आता, मला जगात माझे स्थान शोधायचे आहे. म्हणून, मी युनायटेड किंगडममधील लीड्स युनिव्हर्सिटीमध्ये एमएससी इन इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट कोर्समध्ये प्रवेश घेतला, असे किरणने सांगितले. किरणच्या म्हणण्यानुसार तिला लीड्स युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला आहे. मात्र, त्यासाठी लाखो रुपयांची गरज होती. त्यामुळे तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचे ठरवले. तिने शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांनी तत्काळ सामाजिक न्याय विभागाला महाराष्ट्र सरकारकडून शैक्षणिक शिष्यवृत्ती मंजूर करण्यास सांगितले.

परदेशात स्थायिक होणार नाही

किरणला 40 लाखांची शिष्यवृत्ती मंजूर झाली. मात्र ती वेळेत मिळणे आवश्यक होते. 20 सप्टेंबरला 40 लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीची रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाली. लीड्स विद्यापीठातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपण परदेशात राहणार नाही, असे किरणने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.