विदर्भ ॲग्रो सोल्यूशन कंपनीकडून हळद उत्पादकांची फसवणूक

हळद खरेदी करून दिले खोटे धनादेश : जनआक्रोश संघटनेचे ॲड. अमोल बावणे यांचा आरोप

चंद्रपूर : वर्धा येथील विदर्भ ॲग्रो सोल्यूशन कंपनीने हळद उत्पादक शेतकऱ्यांकडून हळद खरेदी करून मोबदल्यात धनादेश दिले. मात्र, शेतकऱ्यांना दिलेले धनादेश वटलेच नाही. दरम्यान, कंपनीचे संचालक प्रकाश लोखंडे यांचा संपर्क होत नसल्याने हळद उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला असून, लोखंडे याचा शोध घेऊन गुन्हे दाखल करण्याची आणि कठोर कारवाईची मागणी जनआक्रोश संघटनेचे ॲड. अमोल बावणे यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

विदर्भ अॅग्रो सोल्युशन कंपनीचे संचालक प्रकाश लोखंडे यांनी वरोरा तालुक्यातील बोडखा मोकाशी येथील हळद उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क साधला. शेतकऱ्यांना चांगला भाव देण्याचे आश्वासन देऊन सुकी हळद खरेदी करण्यात आली. सुरुवातीला शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात 50 हजार रुपये आणि उर्वरित रकमेचे धनादेश देण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांनी धनादेश बँकेत जमा केल्यानंतर धनादेश बाऊन्स झाले. यानंतर शेतकऱ्यांनी प्रकाश लोखंडे यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, प्रत्येक वेळी त्याला टाळाटाळ केली जात आहे. आता त्याच्याशी संपर्क होत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

प्रकाश लोखंडे यांनी वरोरा शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. हळदही गेली आणि पैसेही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट कोसळले आहे. बोडखा मोखाळा येथील शेतकरी विलास तुराळे यांनी 4 लाख 40 हजार, पुणेश्‍वर तुराळे यांचे 2 लाख 28 हजार, उत्तम तुराळे 1.50 लाख, प्रल्हाद मेश्राम 2.50 लाख, देविदास हुलके 65 हजार आणि शेतकरी किसना चिडे यांनी 1 लाख 10 हजार रुपये कंपनीला दिले आहेत, अशी माहिती अ‍ॅड. बावणे यांनी दिली.

याबाबतच्या तक्रारी सहकार व पणन विभागाचे सचिव, पोलीस महासंचालक व मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. धनादेश वटल्याप्रकरणी वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, प्रकाश लोखंडे यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. लोखंडे याचा शोध घेऊन कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे, त्याच्या विदर्भ ॲग्रो सोल्यूशन कंपनीची परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी ॲड. बावणे यांनी केली. पत्रकार परिषदेला राजू कुकडे व पीडित शेतकरी उपस्थित होते.