मनपा आयुक्तांच्या हस्ते RRR केंद्राचे लोकार्पण

नागरिकांनी रिड्युस, रियूज व रिसायकल वर भर द्यावा: आयुक्तांचे आवाहन

नागपूर : केंद्र शासनाच्या ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या (Nmc) दहाही झोन निहाय ३८ ठिकाणी रिड्युस, रियूज व रिसायकल अर्थात RRR केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यातील धरमपेठ झोन कार्यालय येथील केंद्राचे लोकार्पण (Innougration) मनपाचे आयुक्त राधाकृष्णन बी. (Radhakrushanan B) यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी आपल्या घरातील निरुपयोगी असलेले साहित्य जुने कपडे, पुस्तके, बॅग, खेळणी, प्लॅस्टिक आदी वस्तू ‘RRR’ केंद्रामध्ये जमा करून गरजुवंताना लाभ देण्यास सहकार्य करावे. असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यावेळी केले.

धरमपेठ झोन कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या RRR केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त तथा समाज विकास विभागाचे उपायुक्त प्रकाश वराडे, सहायक आयुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षाणी,  एल. एम. राठोड,  प्रमोद मोकडे, राठोड,  मनोहर राठोड, नूतन मोरे, प्रिया रहांगडाले, शक्ती शेट्टी, सुरेश खरे, सावित्री महिला बचत गटाच्या संचालिका संघमित्रा रामटेके यांच्या सह मनपाचे पदाधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

मार्गदर्शन करतांना आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी. म्हणाले की, नागपूर शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. तसेच स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी मानपद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्र शासनाने देखील शहर स्वच्छतेकडे आणखी एक पाऊल उचलत ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत रिड्युस, रियूज व रिसायकल वर भर दिल्या जात आहे. त्यानुसार मनपाच्या दहाही झोन अंतर्गत विविध ३८ ठिकाणी ‘RRR’ केंद्र सुरु करण्यात आले असून, विविध बचत गटांच्या माध्यमातून हे केंद्र चालविण्यात येत आहेत.

शहरातील नागरिकांनी आपली वापरलेली जुनी पुस्तके प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आदी निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुनर्वापर करण्यासाठी RRR केंद्रांवर जमा कराव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले. हे ‘RRR’ केंद्र म्हणजे मनपा प्रशासन आणि नागरिक यांच्यासाठी ‘WWW’ अर्थ विन,विन, विन परिस्थिती आहे, ज्यात नागरिकांच्या जवळच्या निरुपयोगी वस्तूंचा बचत गटाच्या महिलांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी होत आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे पं. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गट स्थापित करण्यात आले आहेत. नागपूर शहराला स्वच्छ सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी थ्री R रिड्युस, रियूज व रिसायकल वर भर देत बचत गटांच्या माध्यमातून हे RRR केंद्र चालविण्यात येत आहेत. याशिवाय पं. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित महिला बचत गटांमार्फत नागरिकांना ओलाकचरा तसेच सुका कचरा वेगवेगळा संकलित करून तो तसाच वेगवेगळा कचरा गाडीमध्ये टाकला जाईल याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.