गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांचे फलकाद्वारे आवाहन.

Gadchiroli Naxal AC
Gadchiroli Naxal AC

हिंदुत्ववादी विचारसरणीविरुद्ध जनयुद्ध उभारा.

गडचिरोली (Gadchiroli) : गुरुवारी 21 सप्टेंबरपासून नक्षलवादी संघटनेच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त नक्षल स्थापना सप्ताहाला सुरुवात झाली. यात पहिल्याच दिवशी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम धोडराज ठाण्याच्या हद्दीतील हिंदेवाडा येथे मुख्य रस्त्यावर नक्षलवाद्यांनी लाल रंगाचे फलक लावून हिंदुत्ववादी विचारसरणीविरुद्ध जनयुद्ध उभारण्याचे आव्हान केले आहे. दरम्यान, पोलिसांनी हे पोस्टर काढले असून तपास सुरु केला आहे.

नक्षलवादी संघटनेच्या 19 वा वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय समितीने ऑगस्टमध्ये 28 पानांचे पत्रक काढून थेट भाजपला इशारा दिला होता. वर्धापन दिनानिमित्त 21 ते 27 सप्टेंबर 2023 दरम्यान नक्षल सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केलेे आहे. दरम्यान, सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी 21 सप्टेंबरला भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा फाट्यावरील रस्त्यावर दोन झाडांना नक्षल्यांनी फलक लावले. त्यात संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त नक्षल सप्ताह उत्साहात व दृढ संकल्पासह साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

या फलकात ब्राह्मणीय हिंदुत्ववादाविरुद्ध लढा देण्यासाठी व्यापक जनयुद्धाची हाक दिली आहे. संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. यात केंद्रीय कमिटी भारत की कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) असा उल्लेख आहे. दरम्यान, परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत फलक ताब्यात घेतले आहे.

‘सी – 60’ चे जवान तळ ठोकून

गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, धोडराज हद्दीतील हिंदेवाडा फाटा रस्त्यावर नक्षल फलक आढळले आहे. ते ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. नक्षलविरोधी अभियान राबविले जात आहे. त्या भागात पोलीस अधिक अलर्ट आहेत, सी- 60 चे जवान तळ ठोकून आहेत.