उद्योग सुरू करण्यासाठी आता मिळणार १५ लाखांचे कर्ज?

अण्णा-साहेब

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा पुढाकार.

वर्धा (Wardha) : मराठा समाज (Maratha Samaj) व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गातील होतकरू युवकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने गट प्रकल्प योजनेप्रमाणेच वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना राबविली जाते. या योजनेतून १५ लाखांपर्यंत कर्ज दिले जातात. विशेष म्हणजे या कर्जावर ३ लाखांपर्यंत परतावा करण्यात येतो.

वैयक्तीक परतावा योजनेअंतर्गत उद्योग, व्यवसायासाठी पूर्वी १० लाखांपर्यंत कर्ज दिले जात होते. आता ही मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या कर्जातून मोठ्या स्वरुपाचे व्यवसाय होतकरू युवक उभारू शकतात किंवा अस्तित्वातील व्यवसायाची वाढ करता येऊ शकते. उद्योग, व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने १२ टक्के दराने दरसाल दरशेकडा याप्रमाणे व्याज सवलत दिली जाते. ही सवलत १२ टक्के किंवा जास्तीत जास्त ३ लाखाच्या मर्यादेपर्यंत मंजूर केली जाते.

व्याज परताव्याचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्याने वेळेत कर्जाचा हप्ता भरणे आवश्यक आहे. व्याज परतावा कालावधी जास्तीत जास्त ७ वर्षे असा आहे. वेळेत हप्ता भरल्यानंतर व्याज परताव्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. हे कर्ज लाभार्थ्यांने पात्र बॅंकेमार्फत फक्त उद्योग व्यवसायासाठी घेतलेले असावे, तरच परताव्याचा लाभ दिला जातो.

योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गाकरीता तथा ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गातील होतकरू उद्योग, व्यवसाय स्थापण्याची महत्वाकांक्षा असलेल्या लाभार्थ्यांसाठी राबविली जाते. योजनेसाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या आत असावे. उत्पन्नाचा पुरावा म्हणून तहसीलदाराचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. लाभार्थ्याने स्थायिक, कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य आहे. दिव्यांग व्यक्तीला योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिकदृष्ट्या सक्षम असावा.