खासदारांना वाटलेल्या संविधानाच्या प्रतीवरून वाद.

संविधान 1949
संविधान 1949

काँग्रेसचा आरोप- प्रस्तावनेतून समाजवादी-धर्मनिरपेक्ष हे शब्द हटवले.

नवी दिल्ली (New Delhi) : संसदेत सुरू असलेल्या विशेष अधिवेशनादरम्यान नवा वाद निर्माण झाला आहे. नव्या संसदेच्या उद्घाटनावेळी खासदारांना वाटण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीमध्ये छापण्यात आलेल्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द काढून टाकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

याला उत्तर देताना सरकारने म्हटले आहे की, राज्यघटनेच्या प्रतीमध्ये मूळ राज्यघटनेची प्रस्तावना समाविष्ट करण्यात आली आहे. ज्यात ‘सेक्युलर’ आणि ‘सोशलिस्ट’ हे शब्द नव्हते. वास्तविक, हे दोन्ही शब्द 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाविष्ट करण्यात आले होते.

घटनादुरुस्तीशिवाय संविधानात बदल शक्य नाही

या वादाला कायदेशीर पैलूही आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात राज्यघटनेची प्रस्तावना संविधानाचा भाग म्हणून स्वीकारली आहे. अशा स्थितीत कोणताही शब्द काढायचा असेल किंवा समाविष्ट करायचा असेल तर दुसरी घटनादुरुस्ती करावी लागेल.

काँग्रेसने म्हटले- भाजपच्या हेतूवर शंका

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आरोप केला आहे की, ‘आम्हाला माहिती आहे की हे शब्द 1976 मध्ये दुरुस्तीनंतर जोडण्यात आले होते, पण आज जर कोणी आम्हाला संविधान देत असेल आणि त्यात हे शब्द नाहीत तर ही चिंतेची बाब आहे.’

ते म्हणाले की, भाजपचा हेतू संशयास्पद आहे. हे अत्यंत हुशारीने केले आहे. ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. मी हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला, पण मला हा मुद्दा मांडण्याची संधी मिळाली नाही.

कायदामंत्री म्हणाले- हे शब्द मूळ संविधानात नव्हते

अधीर रंजन यांच्या आरोपांवर कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल म्हणाले, ‘राज्यघटना अस्तित्वात आली तेव्हा समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष असे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या 42व्या घटनादुरुस्तीत हे शब्द जोडण्यात आले आहेत.

काँग्रेसने अर्धसत्य सांगितले का?

मात्र, खासदारांना देण्यात आलेल्या प्रतमध्ये मूळ प्रस्तावना आणि सुधारित प्रस्तावना या दोन्हींचा समावेश असल्याचे भास्करच्या तपासात समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पानावर मूळ प्रस्तावना आहे, तर दुसऱ्या पानावर सुधारित प्रस्तावनाही आहे. अधीर रंजन यांचा दावा ठोस नाही कारण त्यांनी संपूर्ण सांगितले नाही. मात्र, जुनी प्रस्तावना का ठेवण्यात आली आहे, हेही स्पष्ट झालेले नाही.