ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचे निवासी प्रशिक्षण

चंद्रपूर : जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभाग व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला शासनाच्या विविध योजनांद्वारे सेवा पुरविण्यात येतात. सदर सेवा पुरवितांना त्याचा दर्जा सर्वोत्तम असावा, त्यातील प्रक्रिया पारदर्शक व लोकाभिमुख असावी यादृष्टीने तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधने शक्य व्हावे, याहेतूने मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख, सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी यांची चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, येथे दोन दिवसीय निवासी कार्यशाळा घेण्यात आली.

या प्रशिक्षणामध्ये उपस्थित अधिकाऱ्यांना शासकीय वित्तीय नियम, डॉट मॅनेजमेंट व डाटा अनालिसिस, पोषण वाटिकाबाबत मार्गदर्शन, क्रीडांगण व सायन्स पार्कबाबत चर्चा व मार्गदर्शन, शैक्षणिक गुणवत्ता व मॉडेल स्कूल उभारणी, कुपोषण मुक्ती, वजन त्यौहार, नाविन्यपूर्ण उपक्रम आदी विविध विषयावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, कपिलनाथ कलोडे, प्रभारी मुख्य लेखा वित्त अधिकारी धर्मराव पेंदाम, कृषी विकास अधिकारी वीरेंद्र रजपूत, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, गटविकास अधिकारी राजुरा हेमंत भिंगारदेवे आदींनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. तसेच डॉ. तायडे यांच्याद्वारे उपस्थित अधिकाऱ्यांना योग प्रशिक्षण देण्यात आले.

 प्रशिक्षण कार्यशाळेमुळे जिल्हा परिषदेतील व पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांना ग्रामीण भागाचा जलद विकास साधण्यास निश्चित मदत होईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यावेळी म्हणाले.