सनातन धर्माविरोधात बोलणे आणि स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणे, यापेक्षा मोठा मूर्खपणा नाही!

Devendra Fadnavis

सनातन धर्माच्या वादात देवेंद्र फडणवीसांची उडी!

मुंबई (Mumbai) : देशात आगामी सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहत आहेत. सत्ताधारी भाजपसह सर्वच विरोधी पक्षांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे. यासाठी ते वेगवेगळी रणनीती आखत आहेत. त्यातच आता सनातन धर्माचा मुद्दा चांगलाच तापला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी याविषयी बोलताना सनातन टीका करणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

इतर धर्मावर असे बोलून दाखवा

फडणवीस (Fadnavis) म्हणाले की, सनातन धर्म किंवा सनातन संस्कृती भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. या देशात कुणीही कुणाच्या धर्मावर बोलू नये. तुम्ही इतर एखाद्या धर्मावर बोलून दाखवा. इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मावर बोललात तर मोठा वाद होतो.

दुसरा कोणताही मूर्खपणा नाही

सनातन धर्माविरोधात अपशब्द वापरणे व नंतर धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करणे, यापेक्षा दुसरा कोणताही मूर्खपणा नाही. सनातन कधीही संपणार नाही. पण सनातनविरोधी ज्यांचे विचार आहेत, त्यांचे विचार मात्र निश्चितच संपुष्टात येतील, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

काय म्हणाले होते उदयनिधी स्टॅलिन?

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र तथा क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी नुकतेच सनातन धर्माविषयी वादग्रस्त विधान केले होते. मलेरिया, डेंग्यू, कोरोना आदी रोगांप्रमाणे सनातन धर्माचे उच्चाटन झाले पाहिजे, असे ते म्हणाले होते. स्टॅलिन यांच्या विधानानंतर देशभरात देशभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. विविध राजकीय पक्षांनी या प्रकरणी स्टॅलिन यांच्यावर टीका केली होती.