पुढील पाच दिवस घराबाहेर पडणं टाळा; तापमान वाढणार…

मुंबई : उन्हाळा सुरू झाला आहे. मात्र, त्यानंतर काही काळ अवकाळी पावसाने राज्याला झोडपून काढले. आता पुन्हा उन्हाचा तडाखा वाढत आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मान्सून कधी येतोय याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र, पुढील पाच दिवस तापमानात वाढ कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. एकेकाळी केवळ विदर्भ आणि मराठवाड्यात दिसणाऱ्या तापमानाचा अनुभव आता मुंबईकरांनाही येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे.

पण, आता त्यात आणखी भर पडणार असून पुढील पाच दिवस राज्याच्या तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येत्या पाच दिवसांत तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आधीच उष्मा जास्त आहे, तो आणखी वाढला तर उष्माघाताने बळी पडणाऱ्यांची संख्याही वाढू शकते.

बुधवारी वर्धा-अमरावती सर्वात उष्ण

गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस त्यात आणखी वाढ होणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत इतर जिल्ह्यांमध्ये तापमान कमी असले तरी आर्द्रतेमुळे कोकण किनारपट्टी अधिक उष्ण जाणवेल. दरम्यान, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुधवारी राज्यातील अमरावती आणि वर्धा भागात सर्वाधिक ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

यंदाचा उन्हाळा अधिक धोकादायक ठरला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्रात यावर्षी उष्माघाताचे १ हजार ४७७ रुग्ण आढळून आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. 2022 मध्ये उष्माघाताची 767 प्रकरणे नोंदवली गेली. तर, 2023 मध्ये उष्माघातामुळे डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रात वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक उष्माघाताने त्रस्त आहेत. वाढत्या उन्हामुळे आणि उन्हात सतत काम केल्याने शरीरात निर्जलीकरण होते आणि मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊन गंभीर झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.