अशोक कोल्हटकर यांना डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान पुरस्कार

संविधान फाऊंडेशनद्वारे गौरव

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑप. बँकेचे ज्येष्ठ पालक संचालक, रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे अध्यक्ष, अशोक कोल्हटकर यांना संविधान व कायद्याच्या सन्मानासाठी आणि संविधान उद्देशिका जागृतीच्या लोकचळवळीतील सकारात्मक व सक्रिय योगदानाबद्दल संविधान फाऊंडेशनतर्फे यावर्षीचा डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संविधान सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंजिनियर असोसिशन बानाई च्या वर्धा रोडवरील सभागृहात गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत, लेखक, कवी साहित्यिक, सामिक्षक दादाकांत धनविजय यांच्या हस्ते अशोक कोल्हटकरांना संविधान सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी रेखा खोब्रागडे, प्रा.महेंद्र मेश्राम, शिरीष कांबळे, देवेश गोंडाणे, अतुल खोब्रागडे, वैशाली गोसावी आदी उपस्थित होते.
अशोक कोल्हटकर यांनी नागपूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी पदावर कार्यरत असताना समर्पित भावनेतून संविधान चळवळ राबविली. त्यांनी संविधानाची प्रास्ताविका नोंद असलेले २०० सोनेरी रंगातील कॅलेंडर महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकारी, अधिकारी, पक्षनेते, कार्यालये आदी ठिकाणी दर्शनी भागात लावण्यास पुढाकार घेतला तसेच संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन केले. संविधान चौकाचे संविधान चौक असे नामकरण आणि संविधान उद्देशिका स्तंभ उभारण्याबाबत पाठपुरावा केला.
त्याचप्रमाणे बेझनबाग नझुल कॉलनी येथील हर्षवर्धन बुद्ध विहार परिसरात अशोक कोल्हटकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने सुंदर आकर्षक संविधान आणि बुद्धिस्ट थीम पार्क करीता मनपा पदाधिकारीतर्फे निधी मंजूर करून आणले. आज या ठिकाणी १८ फूट उंच आकर्षक संविधान उद्देशिका शिलालेख स्तंभ साकारले आहे. १५ फूट उंच अशोक स्तंभ, भव्य स्टेज त्यावर जपानी शिल्पकलेवर आधारित पगोडा, १२ फूट भगवान बुद्धांची ध्यानस्थ प्रतिमा, सुंदर हिरवळ, हिरवे लॉन, रंगीबिरंगी फुलझाडे, भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र आणि विचार संदेश असलेले ४ म्युरल साकारले आहेत. मैत्री बुध्द विहार बेझनबाग येथे १५ फुट उंच संविधान उद्देशिका असलेले भव्य शिलालेख स्तंभ देखील अशोक कोल्हटकर यांच्या प्रयत्नातून साकारलेले आहे. त्यांनी अनेक बुध्द विहारांमध्ये आणि शाळेमध्ये सामाजिक संस्थांच्या कार्यालयात, लग्न आणि वाढदिवस संभारभात संविधान उद्देशिका नोंद असलेली आकर्षक फोटो फ्रेम भेट देऊन तसेच संविधान उद्देशिकेचे रंगीत कॅलेंडर वितरीत करून संविधान उद्देशिका जागृतीचे कार्य केले. त्यांच्या कार्यात त्यांच्या सहचारिनी पमिता कोल्हटकर यांचे सहकार्याने मिळत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत संविधान फाऊंडेशनतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.