गडचिरोलीत जोरदार पाऊस:पुरामुळे दोन प्रमुख मार्गावरील वाहतूक बंद.

Gadchiroli
Gadchiroli

गोसे खुर्दचे ३३ तर निम्न प्रकल्पाचे 31 दरवाजे उघडले.

गडचिरोली (Gadchiroli) : जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत आहे. छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. गडचिरोली- आरमोरी व गडचिरोली- चामोर्शी या दोन मार्गांवरील वाहतूक आज सकाळपासून ठप्प झाली आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 22 दरवाजे अडीच मीटरने, तर 11 दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून 17 हजार 35 क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गडचिरोली नजीकच्या पाल नदीला पूर आला असून, गडचिरोली-आरमोरी मार्ग बंद आहे. शिवाय शिवणी आणि गोविंदपूर नाल्यांनाही पूर आल्याने गडचिरोली-चामोर्शी मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

वर्धा पात्रात विसर्ग सुरू

धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे प्रकल्पाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रकल्पाचे 31 दरवाजे काल रात्री 11 वाजता 35 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. या दरवाजेमधून 969.86 घनमीटर प्रती सेकंद विसर्ग पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. निम्न वर्धा प्रकल्पात पाण्याची आवक वाढत असल्याने प्रकल्पातील पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आले आहे. पाणी सोडल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे देवळी तालुक्यातील पुलगाव ते विटाळा मार्गावरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने हा मार्ग तात्पुरता बंद झाला आहे.