युवास्पार्कच्या जिल्हा संयोजकपदी राधिका दोरखंडे

चंद्रपूर : कला आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत स्पार्क जनविकास फाउंडेशनने  (SPARK Janavikas Foundation) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी युवास्पार्क ह्या विचारपीठाचा प्रारंभ केला असून राजुरा (Rajura) येथील शिवाजी महविद्यालयाची विद्यार्थिनी राधिका दोरखंडे (Radhika Dorkhande) हिची चंद्रपूर जिल्हा संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे.

स्पार्क जनविकास फाउंडेशनच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. युवास्पार्कच्या माध्यमातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने कार्य करण्यात येणार आहे. युवा वर्गीतील नेतृत्व गुण विकासासाठी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वक्तृत्व, नेतृत्व, संभाषण कला, संवाद कौशल्य विकसित करण्यासोबतच ग्रामीण भागातून शहरी भागात शिक्षणासाठी येणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात युवास्पार्क प्रतिनिधींची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती स्पार्क जनविकास फाउंडेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत देण्यात आली. युवास्पार्कच्या जिल्हा संयोजकपदी निवड करण्यात आलेली विद्यार्थिनी राधिका दोरखंडे ही युवा चळवळीत कार्यरत असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय शिबिरात त्यांना उत्कृष्ट विद्यार्थिनीचा खिताब प्राप्त झाला आहे. अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या तत्पर असतात. त्यांच्या या निवडीबद्दल राजुरा येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एम. वरकड, संस्था सचिव अविनाश जाधव यांच्यासह स्पार्कच्या संचालक मंडळाने तिचे अभिनंदन केले आहे.