निरामय जीवनशैली कार्यपद्धती कार्यशाळा शुक्रवारी; डॉ. हेमंत ओस्तवाल यांचे मार्गदर्शन

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपासह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच ताण तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी निरामय जीवनशैली कार्यपद्धतीबद्दल उद्या शुक्रवारी १६ जून रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये सकाळी १० वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेत मोटिव्हेशनल स्पीकर, आरोग्य विषयक मार्गदर्शक नाशिक येथील डॉ. हेमंत ओस्तवाल हे मार्गदर्शन करतील. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांची विशेष उपस्थिती असेल. कार्यशाळेमध्ये नागपूर महानगरपालिकेसह अन्य शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबिय देखील सहभागी होउ शकतात.

मोटिव्हेशनल स्पीकर, आरोग्य विषयक मार्गदर्शक डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी आतापर्यंत भारतातील विविध भागांमध्ये सुमारे ७०० कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले आहे. विशेष म्हणजे त्यांना निरामय जीवनशैली करिता राष्ट्रपती भवन येथे सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. विविध वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे आरोग्य विषयक अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी हजारो विद्यार्थी, पालक आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. विविध संस्था तसेच नागरिकांकरिता १००० हून अधिक आरोग्य शिबिरांचे त्यांनी आयोजन केले आहे.

मनपासह अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये काम करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी, त्यांच्या कामात सुसूत्रता यावी, ताण तणावाचे व्यवस्थापन करून निरामय जीवनशैलीचा अंगीकार करणे अत्यंत आवश्यक आहे. या हेतूने मनपाद्वारे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये मनपासह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित रहावे.