गोसेखुर्दच्या कामावर शॉक लागून कामगाराचा मृत्यू

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील आलेवाही (खरकडा) येथे रविवारी (14 मे) सकाळी 9.30 च्या सुमारास गोसेखुर्द प्रकल्पातील कालव्याचे काम करत असताना विजेचा धक्का लागून एका 25 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. राहुल दिवाकर चिमलवार रा. जीवनापूर असे मृत कामगाराचे नाव आहे. कंपनीने कामगारांना सुरक्षा न दिल्याने हा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत नवभारत कंपनीच्या कार्यालयात मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील आलेवाही खरकाडा परिसरात गोसेखुर्द प्रकल्पाच्या खुल्या कालवा २ चे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. कालव्याच्या कामाचे कंत्राट नवभारत नावाच्या कंपनीला मिळालेले आहे. या ठिकाणी स्थानिक तथा अन्य ठिकाणचे कामगार कार्यरत आहेत.

राहुल चिमलवार हा मागील दोन वर्षांपासून कालव्याच्या कामावर कार्यरत आहे. कंपनीमध्ये कामगार काम करीत असताना त्यांना सुरक्षा पुरविणे बंधनकारक आहे. परंतु या ठिकाणी कपंनीतर्फे कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आज रविवारी जिवनापूर येथील राहुल चिमलवार (२५) हा नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. दरम्यान साडेनऊच्या सुमारास कालव्यावर काम करीत असताना लोखंडी सळाखीचा कालव्यावरून गेलेल्या हायहोल्टेज विद्युत तारांना स्पर्श झाल्याने त्याला जबर विद्युत शॉक लागला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला लगेच कंपनीतर्फे ब्रम्हपुरी येथील रुणालयात हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह सायंकाळी जिवनापूर येथे आणण्यात आले. परंतु मृतक कामगाराच्या कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यास नकार दिला.

कंपनीने कोणतीही सुरक्षा न दिल्याने राहुलचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. राहुल हा कुटुंबाचा एकमेव कमावणारा होता. उघड्यावर त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी आर्थिक मदतीची मागणी केली. कुटुंबीयांनी मृतदेह न स्वीकारल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. तळोधी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळली. मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कंपनीने या कामगाराचा मृतदेह कंपनीत नेला. सायंकाळी सातच्या सुमारास मृतांच्या कुटुंबीयांना चर्चेसाठी बोलावण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी 15 लाखांची मागणी केली.

कंपनी व कुटुंबीय व पोलिसाच्या समक्ष झालेल्या चर्चेतून कंपनीने १५ लाख देण्याचे मान्य केले. तात्काळ २ लाख देण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय मृतदेह स्वीकारण्यास तयार झाले. वृत्तलिहिपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेला नव्हता.