स्पर्धा परीक्षा समिती सरकारच्या धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलन उभारणार

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

तलाठी भरती स्थगित करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी

मुंबई (Mumbai) : राज्य सरकारने बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या तलाठी भरतीमध्येही सातत्याने गैरप्रकार उघडकीस येत आहेत. त्यानंतर परीक्षा सुरूच असल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. शासनाच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलन करणार आहेत.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून हे आंदोलन केले जाणार आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरूवात होणार आहे. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा आणि भ्रष्ट मार्गाने पार पडलेली तलाठी भरती स्थगित करून फेरपरीक्षा घेण्यात यावी, या प्रमुख मागण्या आहेत.

राज्य सरकारने ६ सप्टेंबर रोजी परिपत्रक काढून येणाऱ्या काळात सरकारी नोकर भरतीचे खाजगीकरण करून कंत्राटीकरणाच्या माध्यमातून भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी जे अनेक वर्षांपासून सरकारी नोकरीच्या आशेने अभ्यास करत आहेत त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे, असे समितीने म्हटले आहे.