“खेलो चांदा” उपक्रमातून ७५ क्रीडांगण निर्माण करणार

Chandrapur
Chandrapur

चंद्रपूर जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

चंद्रपूर (Chandrapur) : तंत्रज्ञान आणि मोबाईलच्या काळात मुलांचे मैदानी खेळ कमी झाले आहे. त्यामुळे मुलांच्या जीवनात क्रीडांगणात खेळाचे महत्व ओळखुन तसेच राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरीय खेळाडू निर्माण व्हावे यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने “खेलो चांदा” या नाविन्यपूर्ण उपक्रमातून १५ तालुक्यात ७५ क्रिडांगण निर्माणाची योजना आहे. या उपक्रम सुरूवात झाली असून मुलांच्या मैदानी खेळातील विकास व प्रतिभांचा शोध घेवून त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलांचे स्वप्न साकार करण्याकरिता पुढाकार घेतलेला आहे. हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला आहे. आदिवासी क्षेत्रातील मुलांची शरिरयष्टी काटक आणि दणकट असल्याने येथील मुलांना जर मैदानी खेळांचे योग्य प्रशिक्षण मिळाले तर नक्कीच राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरीय खेळाडू निर्माण होईल. यासाठीच प्रत्येक तालुक्याला ५ याप्रमाणे १५ तालुक्यात ७५ क्रिडांगणे निर्माण करण्याची योजना आहे.

यातून ग्रामीण भागातील मुलांना मैदानी खेळ तसेच विविध क्रिडाप्रकार याबाबत भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये क्रिडा संस्कृती रुजवणे तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये जिल्हयाचे प्रतिनिधित्व वाढविणे पर्यायाने क्रिडाक्षेत्रात टक्का वाढविणे शक्य होईल. खेलो चांदा या उपक्रमाची अंमलबजावणी करणारी मुख्य यंत्रणा नरेगा असून नरेगाच्या माध्यमातून वृक्ष लागवड करणे व क्रिडांगणाची देखभाल करण्याचे कामही करण्यात येणार आहे. यासोबत सहाय्यक यंत्रणा म्हणून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत समुदाय स्वच्छता संकुले तयार करण्यात येणार आहे. यामध्ये मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृहे तसेच शौचालये बांधण्यात येणार आहेत.

ग्रामनिधीच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था, दिवाबत्तीची सोय तसेच बाकडे बसविण्यात येणार आहेत. तसेच सोलर हायमास्ट पथदिवे, खुल्या व्यायामशाळा व क्रिडा साहित्य पुरविण्यात येणार आहे. “खेलो चांदा” या नाविण्यपुर्ण उपक्रमातून ग्रामीण भागातील मुला-मुलीसाठी जिल्हास्तरीय खेलो चांदा केंद्र तयार होईल. यातुन मुलांचा सामुहिक विकास, मैदानी खेळातील विकास, वार्षिक क्रिडा स्पर्धा, मुलांमधील प्रतिभांचा शोध घेणे आणि त्याचा विकास करून राष्ट्रीय, विभागीय आणि राज्य स्तरीय क्रिडा सहभाग होणार आहे. ग्रामीण पारंपारिक खेळ खो-खो, गोळाफेक यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, धावणे यासारख्या खेळामधुन मुलांचा सामुहिक विकास करणे शक्य होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी सांगितले.