लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षक कायद्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

नागपूर : नागपूर महानगरपालिका, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा परिषद आणि शिक्षणविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालकांचे अधिकार व बालकांसाठी असलेल्या कायद्यांबाबत जागृती’ कार्यक्रमाचा शुभारंभ आज शुक्रवारी १४ जुलै रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे करण्यात आला. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून जिल्हा न्यायायाधीश श्री.जे.पी. झपाटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर नागपूर चे सचिव श्री. सचिन पाटील, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलिस उपायुक्त (डीसीपी) सुदर्शन, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री. रोशन बागडे, शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, मनपा शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पुसेकर, जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी श्री रविन्द्र काटोलकर आदी उपस्थित होते.

लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षक कायदा, बालकांचे अधिकार, बाल न्याय, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकारण योजना या विषयावर व कायद्यांसंबंधी जनजागृतीच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत एक महिना विविध शाळांमध्ये जाऊन १८ वर्षाखालील असलेल्या कोणत्याही मुलगा किंवा मुलीसोबत लैगिंक छळ किंवा गैरव्यवहार व्हायला नको याकरिता बाल कायदा व अधिकारांविषयी विद्यार्थांना माहिती देण्यात येणार आहे.

कार्यक्रमात प्रारंभी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर नागपूरचे श्री. सचिन पाटील यांनी भारतीय संविधानाचे उदहारण सर्वांसमोर ठेवले व सामान अधिकाराची जाणीव करून दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे घोषवाक्य ‘न्याय सर्वांसाठी’ याचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला. समाजात आदिवासी, दुर्बल घटक, आर्थिक दृष्टया हतबल असण्याऱ्या लोकांना त्यांच्या अधिकाराचे ध्यान देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामान अधिकार मिळाले पाहिजे, यासाठी सरकारकडून सतत प्रयत्न केले जातात. सर्वांना सामान हक्क, अधिकार, कायद्याविषयी माहिती, कल्याणकारी योजना याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अन्यायाला वाचा फोडता यावी आणि ते उज्जल भविष्यासाठी तयार व्हावे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा न्यायायाधीश श्री.जे.पी. झपाटे यांनी सहा महिन्यात महाराष्ट्रातून १३ हजार मुली गायब झाल्याची माहिती दिली. याबाबतचे विविध कारणे त्यांनी विषद केले. लहान वयात मुलांचे मन कोऱ्या कागदासारखे असते, लहान वयात जे शिकविले ते त्यांच्या मनावर कोरले जाते. त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन लैंगिक शिक्षणाविषयी जागृत करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. लहान वयात काही गोष्टी घडल्यास बालमनावर परिणाम होतो आणि त्याचे परिणाम मोठ्या वयात दिसून येतात. ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत मुलांना संरक्षण दिले जाते. बालकासोबत काही गैरव्यवहार झाल्यास त्याने धाडसाने समोर यावे, असे त्यांनी विद्यार्थांना आवाहन केले.

जिल्हा परिषद नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी सायबर गुन्हे याविषयी माहिती दिली. आजकाल लहान वयात मुले समाज माध्यमांवर ऍक्टिव्ह राहतात. मोबाईल, इंटरनेटवर अनेक गोष्टी बघतात, त्याला बळी पडतात. व्हाट्सॲप-फेसबुकच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांविषयी त्या बोलल्या. लहान मुलांवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये घरातील नातेवाईक किंवा कोणी जवळची व्यक्तीच दुष्कर्म करणारी असते, असे दिसून येते. पण असे झाल्यास गुन्हे लपवू नका. मुलांना आधार द्या, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करा, असेही त्या म्हणाल्या. लहान मुलांना लैगिंक छळ काय आहे, हे समजावून सांगण्याचे आवाहन त्यांनी पालक आणि शिक्षकांना केले. विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक छळ जनजागृती संदर्भात माहिती देणारी व जनजागृती करणारी एक व्यक्ती प्रत्येक शाळेत वर्ग निहाय नियुक्त करण्याचा प्रस्ताव देखील त्यांनी यावेळी मांडला.

पोलिस उपायुक्त (डीसीपी) सुदर्शन यांनी लैंगिक गुन्हापासून बालकांचे संरक्षक कायदा याविषयी मुलांना मार्गदर्शन केले. पोलिस प्रशासनाद्वारे चालविण्यात येणा-या ‘पोलिस दिदी, पोलिस काका’ या अभियानांबद्दल त्यांनी माहिती दिली. कोणताही बालक लैगिंक छळाला बळी पडायला नको म्हणून ‘पोक्सो’ कायदा, ‘गुड टच, बॅड टच’ या सर्व विषयांवर ‘पोलिस दिदी, पोलिस काका’ यांच्या मार्फत शाळा-शाळांमध्ये जाऊन जागृती केली जाते, असेही त्यांनी सांगितले.

मुलांसोबत गैरव्यवहार किंवा अत्याचार झाल्यास त्यांना न्याय मिळावा याकरिता शासनाने आणलेल्या ‘पोक्सो’ कायद्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून कायदा व अधिकार याविषयी जनजागृती केली जाते. कोणत्याही व्यक्तीसोबत दुष्कर्म घडल्यास, ती व्यक्ती आर्थिक दृष्ट्या मागास असेल तर त्याला न्याय मिळावा याकरिता मोफत वकील दिला जातो. कोणत्याही बालकासोबत काहीही अनुचित व्यवहार झाल्यास त्याने न घाबरता लगेच आपल्या पालकांना, शिक्षकांना किंवा निकटवर्तीयांना सांगितल्यास गुन्हेगार लवकर पकडला जाईल, असा सल्ला जिल्हा वकील संघ अध्यक्ष श्री. रोशन बागडे यांनी विद्यार्थांना दिला.

या कार्यक्रमाचे संचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे विधी स्वयंसेवक श्री. आनंद मांजरखेडे यांनी केले. आभार विधी स्वयंसेवक श्री. मुकुंद आडेवार यांनी मानले. कार्यक्रमात शिक्षक, शालेय विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.