सेल्फी पॉईंटला भेट देत आयुक्तांनी वाढविला नागरिकांचा उत्साह

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी घेतलं सेल्फी स्टॅन्ड/ पॉईंटचा आढावा; माझी माती माझा देश उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात माझी माती माझा देश अर्थात मेरी माटी मेरा देश अभियान राबविण्यात येत आहे. अभियान अंतर्गत पंच प्रण प्रतिज्ञा आणि सेल्फी या उपक्रमाकरिता शहरात ७५ ठिकाणी सेल्फी पॉईंट/स्टँड उभारण्यात आले आहेत. शनिवारी (ता.१२) नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यापैकी काही सेल्फी पॉईंटला भेट देत नागरिकांचा उत्साह द्विगुणित केला.
याप्रसंगी मेरी माटी मेरा देश अभियानाचे नोडल अधिकारी व मनपा उपायुक्त सुरेश बगळे, मिलिंद मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, माजी वायुसैनिक कल्याण संघटनाचे अजय चौहान, वैशाली चौहान, संजय दहीकर, रामभाऊ तिडके, धनंजय जाधव, रेवती पार्लीकर यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. मनपाद्वारा उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्यासाठी नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मातृभूमीविषयीचे प्रत्येक भारतीयाचे प्रेम आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांविषयीचा अभिमान व्यक्त करणारे विविध उपक्रम केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात माझी माती माझा देश अभियानामध्ये नागपूर महानगरपालिकाद्वारा राबविण्यात येत आहे.
 यात शिलाफलकम, पंच प्रण प्रतिज्ञा आणि सेल्फी, वसुधा वंदन, वीरों का वंदन, ध्वजारोहन आणि राष्ट्रगीत या पाच तत्वांवर कार्य केले जात आहेत. यातील एक महत्वाचा भाग म्हणजे हातात माती किंवा मातीचा दिवा घेउन पंच प्रण प्रतिज्ञा घेताना सेल्फी घ्यायचा. हा सेल्फी केंद्राच्या संकेतस्थळावर अपलोड करून प्रमाणपत्र प्राप्त केले जात आहे. याकरिता शहरात ७५ विविध ठिकाणी असे सेल्फी स्टँड उभारण्यात आले आहेत. याशिवाय पूर्व नागपुरात आंबेडकर उद्यान, पश्चिम नागपुरात फुटाळा तलाव, दक्षिण-पश्चिम नागपुरातील विवेकानंद स्मारक अंबाझरी, एअर फोर्स, अमर जवान स्मारक अजनी चौक, दक्षिण नागपुरातील रेशीमबाग, मध्य नागपुरातील चिटणीस पार्क स्टेडियम, उत्तर नागपुरातील जरीपटका उद्यान या प्रमुख ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत.
यापैकी काही सेल्फी पॉईंटला भेट मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः सेल्फी काढत उपस्थित नागरिकांचा उत्साह वाढविला. तसेच सेल्फी स्टॅन्ड/ पॉईंटची पाहणी करीत नागरिकांना गैरसोय होऊ नये असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागरिकांनी आपल्या नजीकच्या सेल्फी पॉईंट स्थळी भेट देउन सेल्फी काढावा आणि तो केंद्राच्या संकेतस्थळावर अपलोड करून प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे समस्त नागपूरकरांना केले.
14 ऑगस्ट रोजी ‘सामूहिक पंच प्रण प्रतिज्ञा’
 
नागपूर महानगरपालिकाद्वारा माझी माती, माझा देश अभियानांर्तगत ‘सामूहिक पंच प्रण प्रतिज्ञा’ सोमवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता फुटाळा तलाव परिसर येथे घेण्यात येणार आहे. तरी समस्त नागपूरकरांनी राष्ट्र भक्तीच्या या अभिनव अभियानात मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करावा. असे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.