13  ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा

'हर घर तिरंगा' अभियानात सहभागी होण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिका-यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 12 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान तिरंगा झेंडा उत्स्फुर्तपणे फडकवायचा आहे.

सदर उपक्रमाकरिता ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगर पालिकेने नागरिकांना झेंडे उपलब्ध करुन दिले आहे. प्रशासनाने सर्व नागरिकाना दिनांक १३ ते १५ दरम्यान घरोघरी झेंडे लावण्याचे व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सक्रिय सहभाग नोंदविन्याचे आवाहन केले आहे.  त्याचप्रमाणे ध्वज संहितेचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

तिरंगा फडकवण्याच्या नियमाबाबत सूचना

◆ प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा संहितेचे पालन करावे. ◆ तिरंगा फडकवताना केशरी रंग वरच्या बाजूने असावा. ◆ तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरवावा. ◆ घरोघरी तिरंगा हा 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत फडकलेला असेल. दररोज सायंकाळी उतरविण्याची आवश्यकता नाही. ◆ कार्यालयांनी ध्वज संहिता पाळावी. ◆ 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर झेंडा या उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येकाने सन्मानाने व सुरक्षित ठेवावे. ◆  अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जाऊ नये. तो सन्मानाने जतन करून ठेवावा. ◆ अर्धा झुकलेला, फाटलेला, कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावण्यात येऊ नये.

पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन :  हर घर तिरंगा अभियान दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत असून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी या अभियानात आपला सहभाग नोंदवावा. तसेच 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता आपल्या घरावर सन्मानाने झेंडा लावावा. 15 ऑगस्ट रोजी सूर्यास्तापूर्वी सदर झेंडा सन्मानाने खाली उतरवावा. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.