प्रगतीच्या शिखरावर नेऊन देशाला एकसंध ठेवण्याची ताकद संविधानातच

ना. डॉ. अरविंद सिंह भदोरिया यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्री जपून संविधानातून देशातील वंचित, पीडित घटकाच्या सामाजिक न्यायाची द्वारे मोकळी केली. समस्त भारतीयांच्या आजच्या यशाचे आणि यशोशिखराकडे वाटचालीचे श्रेय बाबासाहेबांच्या संघर्षाला दिले जाते. देशाला प्रगतीच्या शिखरावर नेताना एकसंध ठेवण्याची ताकद संविधानातच आहे, असे प्रतिपादन मध्य प्रदेश सरकारमधील सहकारिता मंत्री डॉ. अरविंद सिंह भदोरिया यांनी केले.

ना. डॉ. भदोरिया यांनी रविवारी (ता.११) दीक्षाभूमी येथे भेट दिली व तथागत भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलषाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत राज्यसभा सदस्य खा. रामभाई मोकारिया, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम उपस्थित होते. यावेळी ना. डॉ. अरविंद सिंह भदोरिया यांनी मत व्यक्त केले.

मान्यवरांनी तथागत भगवान बुद्ध मूर्तीला पुष्पहार अर्पण केले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलषावर पुष्पवर्षाव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे, प्रभाकर दुपारे, जितेंद्र म्हैसकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याशिवाय भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष राजेश हाथीबेड, प्रदेश सचिव सतीश शिरसवान, सतीश डागोर व शहर मोर्चाच्या पदाधिकार्यांनी सुद्धा याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत केले.