12 ते 14 जून पर्यंत जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ जारी

चंद्रपुर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सुचनेनुसार 12 ते 14 जून 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी ‘येलो अर्लट’ जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात एक – दोन ठिकाणी वादळी विजेच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

काय करावे आणि काय करू नये याबाबत सुचना :

वादळ मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असतांना काय करावे आणि काय करू नये, याबाबत प्रशासनाने नागरिकांसाठी सुचना निर्गमित केल्या आहेत. विजेच्या गडगडाटासह पावसाची पुर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जावून गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. घरातील विद्युत उपकरणे त्वरीत बंद करा, ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

आकाशात विजा चमकत असल्यास फोनचा वापर करू नका. शॉवरखाली आंघोळ करू नये. घरातील बेसीनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा उपयोग करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असतांना लोखंडी धातुच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातुच्या उंच मनो-याजवळ उभे राहू नका. घरात असाल तर उघड्या दारातून किंवा खिडकीतून वीज पडतांना पाहू नका, हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषत: शेतक-यांनी धान्याची उचित काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सचिव विशालकुमार मेश्राम यांनी कळविले आहे.