७० हजार प्रवासी करतात महाकार्डने प्रवास; कॅशलेस प्रवास ठरतोय नागरिकांची पहिली पसंती

नागपूर : महा मेट्रोने नेहमीच तिकीट खरेदी करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले आहे. याकरिता मोबाइल ऍप, ऑनलाईन पेमेंट आणि महाकार्डसह अनेक पर्याय प्रवाश्यांना उपलब्ध करून दिले आहेत. याच प्रयत्नांची पावती म्हणजे नागपूरकरांनी महा कार्डची मोठ्या प्रमाणात केलेली खरेदी. आतापर्यंत एकूण ७० हजारपेक्षा अधिक नागरिकांनी महाकार्ड प्राप्त केले आहेत. महा कार्डच्या माध्यमातून नागपूर मेट्रो विविध सवलती देखील देत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) सहकार्याने या कार्डचे संचालन करण्यात येत आहे.

प्रवाश्यांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच आरोग्याचा विचार करता स्पर्श विहीन व्यवस्थापनाकरिता महा मेट्रोने EMV (युरो मास्टर व्हिसा) स्मार्ट कार्ड आधारित ओपन लूप ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) प्रणाली स्वीकारली आहे आणि ही नागपुरातील सर्व मेट्रो स्थानकांवर लागू करण्यात आली आहे. ह्या प्रणालीच्या माध्यमातून प्रवासी महा कार्डचा उपयोग करून कॅशलेस आणि विनास्पर्श, तसेच सवलतींवर सहज सुलभ प्रवास करू शकतात.

या प्रणालीच्या माध्यामाने प्रवाश्यांना ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना मेट्रो स्टेशनवरील ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (एएफसी) गेट्सवर फक्त त्यांचे महा कार्ड टॅप करावे लागते आणि त्या माध्यमाने प्रवासी भाडे कार्डमधून कापल्या जाते. महा कार्ड आणि अत्याधुनिक एएफसी प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक असून जेवढा प्रवास केला असेल तेवढेच भाडे कार्ड मधून वजा केले जाते. ईएमव्ही आधारित स्मार्ट कार्ड ओरिएंटेड ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टीम (AFC) हे प्रवास भाडे भरण्यासाठी उत्तम उपाय आहे.

 महाकार्डची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :
• मेट्रो स्थानकांवर महा कार्डची खरेदी तसेच टॉपअप करता येते.
• अत्यंत सुरक्षित चिप आधारित ड्युअल इंटरफेस (संपर्क आणि संपर्करहित) स्मार्ट कार्ड.
• स्वाईप करण्याच्या पद्धतीचा अवलंब
• इंटरनेट आणि मोबाइल आधारित व्यवहारांसाठी सुसंगत
• (Europay, Master, Visa, Rupay) प्लॅटफॉर्मवर स्वीकृत वैयक्तिक कार्ड.
महा कार्ड आणि एएफसी प्रणालीमुळे मेट्रोने प्रवास करणे सोपे आणि स्वस्त तर झाले आहेच पण या सोबतच कार्डच्या वापरामुळे कागदांची बचत करण्यास मदत होते आणि कचरा टाळला जातो यादृष्टीने ते पर्यावरण पूरक देखील आहे.

महा मेट्रोने आजपर्यंत प्रवाश्यांच्या दृष्टीने अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात विशेषत्वाने विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात ३० टक्के सवलत, शनिवार आणि रविवार या दोन दिवशी वीकएंड सवलत, दैनिक पास फक्त १००रुपयात आणि महाकार्डने प्रवास केल्यास प्रत्येक प्रवासावर १० टक्के सवलत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या ३०% सवलतींमुळे विद्यार्थ्यांमध्ये मेट्रो प्रवास जास्त लोकप्रिय झाला आहे. ह्याचीच दखल घेत महा मेट्रो नागपूरने २०० रुपयांच्या टॉपअप करून महाकार्ड मोफत देण्याची ऑफर आता १४ ऑगस्टपर्यंत वाढविली आहे.