मनपाचे रुग्णालय सज्ज ठेवण्याचे आयुक्तांचे निर्देश

अतिरिक्त आयुक्तांनी घेतला रुग्णालयांतील व्यवस्थेचा आढावा

नागपूर : शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता संभाव्य धोका टाळता यावा यासाठी मनपाची सर्व रुग्णालये सज्ज ठेवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी आरोग्य विभागाला दिले.

कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी विभागाला दिले होते. आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी मनपाच्या विविध रुग्णालयांमध्ये भेट देउन वैद्यकीय आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी इंदिरा गांधी रुग्णालय गांधी नगर, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि आसोलेशन रुग्णालयाची पाहणी केली व येथील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ऑक्सिजन आणि खाटांच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. या सर्व रुग्णालयात केन्द्र शासनाच्या निर्देशानुसार Mock – drill सुध्दा करण्यात आली.

यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता सुनील उईके, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आणि त्या त्या झोनचे कार्यकारी अभियंता तसेच झोनल वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा लागली कामाला

राम जोशी यांनी आरोग्य विभागाला ऑक्सिजन पाईप लाईनची तपासणी करणे, स्वच्छता राखणे आणि कोव्हिड रुग्णाला भरती करण्याची तयारी ठेवण्याचे निर्देश दिले. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये ८० ऑक्सिजन खाटा असून १६ आयसीयू बेड्स यासोबतच पीएसए प्लांट आहे. तसेच आयसोलेशन रुग्णालयामध्ये ३० ऑक्सिजन बेड्स असून इथे सुद्धा पीएसए प्लांट आहे. पाचपावली स्त्री रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन प्लांट असून ११० ऑक्सिजन बेड्स आहेत. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी व नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा कामाला लागली असून रुग्णांना सर्व प्रकारची सुविधा पुरवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिले.