‘पंचप्रण’ शपथेतून कर्तव्यदक्ष राहण्याचा संकल्प

 नियोजन सभागृहात अधिकारी कर्मचा-यांनी घेतली शपथ

चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप ‘मेरी माटी, मेरा देश’ (माझी माती, माझा देश) अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. शासनाच्या सुचनेनुसार या अभियानांतर्गत जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी सर्व शासकीय कार्यालयात ‘पंचप्रण’ शपथेचे आयोजन करण्यात आले. नियोजन भवनात झालेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात अधिकारी व कर्मचा-यांनी ‘पंचप्रण’ शपथेतून कर्तव्यदक्ष राहण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अश्विनी मंजे, अतुल जतळे (पुनर्वसन) यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, गत दोन वर्षांपासून सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमाने या महिन्याअखेर होणार आहे. त्यासाठी गावागावातील मातीचा कलश ब्लॉकस्तरावर एकत्र करून दिल्लीच्या कर्तव्यपथावर नेण्याचे नियोजन आहे. आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करतांना प्रत्येकाने निसर्गाची जपणूक केली पाहिजे. आपला समृध्द वारसा आणि परंपरांचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या वारसाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपण केवळ अधिकारांप्रती जागरूक असतो, मात्र आपल्या कर्तव्याप्रतीसुध्दा प्रत्येकाने जागरूक असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकातून निवासी उपजिल्हाधिकारी  कुंभार म्हणाले, गत दोन वर्षांपासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. ऑगस्ट महिन्याअखेर या उपक्रमाची सांगता होणार आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘पंचप्रण’ शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माझी माती, माझा देश या अंतर्गत जिल्हा, तालुका, गावपातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आपला देश, देशप्रेम, देशाची एकात्मता आणि अखंडता, आपला वारसा आणि विविध परंपरांचे आपल्या दैनंदिन आचारणामध्ये उपयोग व्हावा, तरच देश प्रगतीपथावर जाईल, असे ते म्हणाले. यावेळी इतरही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी उपस्थित अधिकारी / कर्मचा-यांना पंचप्रण शपथ दिली की, 1.भारताला विकसित देश बनवायचे आहे तसेच 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. 2. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. 3. देशाच्या समृध्द वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. 4. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. 5. नागरिकाचे कर्तव्य बजावयाचे आहे, तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे.