‘तेलंगना मॉडेल’नेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विकास होऊ शकतो; माजी आमदार चरण वाघमारे यांचा विश्वास

जिल्ह्यात बीआरएस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचाही दावा

चंद्रपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे. कर्जबाजारीपणा हा राज्यातील शेतकऱ्यांची साथ सोडायला तयार नाही, अशा अवस्थेत राज्यातील शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून आणि आत्महत्येच्या संकटातून बाहेर काढायचे असेल तर तेलंगना मॉडेलशिवाय पर्याय नाही, असा विश्वास माजी आमदार तथा भारत राष्ट्र समितीचे विदर्भ समन्वयक चरण वाघमारे यांनी व्यक्त केला. सोमवारी त्यांनी चंद्रपुरात पक्षाचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाच्या भूमिकेविषयी संवाद साधला.

बीआरएसला चंद्रपूर जिल्ह्यात मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कार्यकर्ता नोंदणीने लाखाचा टप्पा पार केला आहे. शेतकरी हीत हेच पक्षाचे ध्येय असल्याने राज्यभरातील शेतकरी मोठ्या संख्येने या पक्षाशी जुळत आहे. तेलंगनात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सुविधा दिल्या जात आहे. एकरी दहा हजाराची मदत, मोफत वीज आदी सुविधा तेलंगाना सरकार देत असून, राज्यात बीआरएसचे सरकार आल्याने तेलंगना मॉडेल लागू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बीआरएसच्या धास्तीने राज्यसरकारने अनेक योजनाच्या अनुदानात वाढ केली असली तरी ती तोकडी आहे. येथील लाखो शेतकरी अजूनही पीकविमा, कर्जमाफी, शेतकरी प्रोत्साहन अनुदान या योजनांपासून वंचित असल्याचा आरोप केला.
राज्यात बीआरएस बळकट होत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष ताकदीनीशी रिंगणात उतरणार आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीतही पक्षाचे उमेदवार असतील. तत्पूर्वी राज्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला जाईल, असे वाघमारे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी आमदार बाळासाहेब साळुंखे, प्रा. ज्ञानेश्वर वाकुडकरसह पदाधिकारी उपस्थित होते.