जनसहभागाने ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रम यशस्वी करू; मनपा आयुक्तांचा निर्धार

नागपूर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून शहरातील सर्व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करू, असा निर्धार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी (Abhijit Chaudhari) यांनी व्यक्त केला.

‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाच्या अनुषंगाने सोमवारी रेशीमबाग (Reshimbagh) येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये (Suresh Bhatt Sabhagruh) स्वयंसेवी संस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त बोलत होते. मंचावर उपक्रमाचे नोडल अधिकारी उपायुक्त सुरेश बगळे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, क्रीडा अधिकारी डॉ.पीयूष आंबुलकर, नियंत्रण अधिकारी नितीन भोळे उपस्थित होते. बैठकीला शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शविली.

स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये नागपूर शहरात राबविण्यात येणा-या ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाची माहिती दिली. या उपक्रमांतर्गत शिलाफलकम, पंच प्रण प्रतिज्ञा आणि सेल्फी, वसुधा वंदन, वीरों का वंदन, ध्वजारोहन आणि राष्ट्रगीत या पाच तत्वांवर कार्य केले जाणार आहेत. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरी तिरंगा झेंडा लावला जाईल व १५ ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगीत गायले जाईल. या पाचही बाबींमध्ये स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी यावेळी केले.

मनपा आयुक्तांच्या आवाहनानंतर स्वयंसेवी संस्थांनी सेल्फी पॉईंट, वृक्षारोपनासह वसुधा वंदन, वीरों का वंदन, सामूहिक राष्ट्रगीत यासारख्या बाबींची त्यांच्या परिसरातील जबाबदारी स्वीकारून सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ईडब्ल्यूडब्ल्यूएएन या स्वयंसेवी संस्थेचे अजय चौहान यांनी अजनी चौकातील अमर जवान स्मारकस्थळी उभारण्यात येणा-या सेल्फी पॉईंटचे तर जीवन सुरक्षा प्रकल्पाचे राजू वाघ यांनी अंबाझरी तलाव येथील स्वामी विवेकानंद स्मारक स्थळी उभारण्यात येणा-या सेल्फी पॉईंटचे पालकत्व स्वीकारले. वीरांगण क्रीडा संस्थेद्वारे देशी क्रीडा प्रकारांचे प्रात्यक्षिक सेल्फी पॉईंटस्थळी दाखविण्यात येतील, अशी ग्वाही संस्थेचे जयंत दीक्षित यांनी दिली.

एक वादळ भारताचे, प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ व्हीजी पॅलेसच्या सुनंदा पुरी, श्रावणमित्र एज्यूकेशन सोसायटीच्या संजीवनी चौधरी, डॉ. महेश तिवारी, व्ही.एन.रेड्डी रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे राहुल शिरसाट, ईडब्ल्यूडब्ल्यूएएन चे अजय चौहान, पतंजलीचे दिपक येवले, जे.डी.स्पोर्ट्स फाउंडेशनचे डॉ.जयप्रकाश दुबळे, पूर्वा फाउंडेशनचे अशोक बंप, विरांगण क्रीडा संस्थेचे जयंत दीक्षित, समर्पन सेवा समितीचे नरेश जुमानी, दृष्टी तज्ञ सार्थक बहुद्देशिय संस्थेचे संजय लहाने, राहुल घोग आदी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी यावेळी आपल्या सूचना मांडल्या.

 मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत तिरंगा

‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमाच्या अंतर्गत सोमवारी मनपाच्या शाळांमधील प्राचार्य आणि मुख्याध्यापकांची देखील बैठक घेण्यात आली. या बैठकीला संबोधित करताना उपायुक्त श्री. सुरेश बगळे यांनी मनपाच्या सर्व शाळांमध्ये उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. शाळांमध्ये देखील सेल्फी पॉईंट उभारून सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांचे सेल्फी काढून ते संकेतस्थळावर अपलोड केले जातील. तसेच पंच प्रण प्रतिज्ञा देखील घेतली जाईल. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा फडविला जाईल, याकरिता मनपाच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला तिरंगा देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम उपस्थित होत्या.