शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित सोडवा; मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांची पत्रपरिषदेत मागणी 

चंद्रपूर : जिज्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या असून, प्रकल्पग्रस्त शेतकरी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित सोडवून त्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंद बावणे यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केली. बुधवारी मनसे शेतकरी सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यानंतर बावणे यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचला.

जिल्ह्यातील परसोडा, कोठोडा, रायपूर, गोविंदपूर या गावांत आरसीसीपीएल कंपनीकडून जमीन संपादित करण्यात आली. या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिसातबारा एक नोकरी आणि ४० लाखरुपये एकमुस्त देण्यात यावे, एकमुस्त रक्कम देणार नाही तोपर्यंत जमिनीवर कोणतेही उत्खनन करण्यात येऊ नये, दलालांचा सुळसुळाट वाढला असून, दलालांमार्फत शेती खरेदी करू नये, अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टीचे पैसे तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट जमा करण्यात यावे, पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी आदी मागण्यांकडे या मोर्चाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आल्याचे बावणे यांनी सांगितले.

शिवाय सीएसआर फंडाचा योग्य ठिकाणी वापर करण्यात यावा, वन्यजीवाच्या हल्ल्यातील मृतकांच्या कुटुंबीयांना त्वरित मोबदला देण्यात यावा, शेती तक्रार निवारण्यासाठी क्विक रिस्पॉन्स यंत्रणा करावी, वीज कंपण्यांकडून होणारी लूट थांबविण्यात यावी आदी मागण्या सोडविण्यासाठी शासनाला निवेदन देण्यात आले असून, यापुढे या मागण्यांसाठी आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बावणे यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेला विधीसेलच्या जिल्हाध्यक्ष ॲड. मंजुश्री लेडांगे, सुनील गुढे, महेश वासलवार, रघुनाथ मडावी, स्वप्नील पेटकर आदी उपस्थित होते.