शहरातील राहणीमानाचा दर्जा वाढविण्यासह मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यावर भर देणार

नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांची ग्वाही

नागपूर : नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. शहरातील नागरिकांचा राहणीमानाचा दर्जा वाढावा, दर्जेदार सोयीसुविधा नागरिकांपर्यंत जलद गतीने पोहोचाव्यात यादृष्टीने आपला भर असेल, अशी ग्वाही नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

नागपूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त तथा प्रशासक म्हणून डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मावळते नागपूर स्मार्ट सिटी सीईओ व मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय गुल्हाने यांनी आयुक्त कक्षात डॉ. अभिजीत चौधरी यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी डॉ. चौधरी यांच्याकडे मनपा आयुक्त तथा प्रशासक म्हणून पदभार सुपूर्द केला.

याप्रसंगी बोलताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, नागपूर शहर हे ‘स्मार्ट सिटी’च्या गणनेतील प्रमुख शहर आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाविन्यपूर्ण, दर्जेदार सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न असणार आहे. स्वच्छ, सुंदर, आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी प्रत्यत्नशील असणार आहे. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करणार असल्याचे देखील ते म्हणाले. राज्यातील विविध भागातील प्रशासकीय अनुभव असणारे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शहराला विकासाचा नवा चेहरा देण्याचा नेहमी प्रयत्न राहिल, असे देखील नमूद केले.

देशाच्या केंद्रस्थानी असलेले नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचे शहर आहेच शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांचे देखील हे शहर आहे. नाविन्यपूर्ण कल्पना, सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा सन्मान करण्यात येईल. या शहरात काम करण्याची संधी मिळत असल्याने, शहरात मुलभूत सुविधा व नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यात मनपा कुठेही कमी पडणार नाही. कुठलेही प्रकल्प व काम करताना ते दर्जात्मक असेल याची दक्षता घेतली जाईल. आपला पुढील कार्यकाळ शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या हितासाठी असेल, अशीही ग्वाही डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी दिली. डॉ. अभिजीत चौधरी यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापुर महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार सांभाळला आहे. त्यांनी भंडारा आणि सांगली जिल्हाधिकारी पदावर सुध्दा काम केले आहे. नागपूर येण्यापूर्वी ते सह. आयुक्त जी.एस.टी. संभाजीनगर येथे कार्यरत होते.

अधिका-यांशी साधला संवाद

मनपाचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पदभार स्वीकारल्या नंतर मनपातील अधिका-यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मावळते नागपूर स्मार्ट सिटी सीईओ व मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय गुल्हाणे यांना मनपाचा मानाचा दुपट्टा, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित केले. श्री. अजय गुल्हाणे यांनी मनपा आणि स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांची माहिती आयुक्तांना दिली. श्री. अजय गुल्हाणे यांची नियुक्त मनरेगा आयुक्त पदावर करण्यात आली आहे.

याप्रसंगी मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, सुरेश बगळे, मिलींद मेश्राम, प्रकाश वराडे, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख श्री. महेश धामेचा, उपसंचालक नगर रचना श्री. प्रमोद गावंडे, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता श्री. अजय मानकर, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. बी.पी. चंदनखेडे, कार्यकारी अभियंता श्री. रवींद्र बुंधाडे, उद्यान अधीक्षक श्री. अमोल चौरपगार, शिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पुसेकर, कार्यकारी अभियंता श्री. कमलेश चव्हाण, सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, हरीश राउत, मुख्य लेखा परीक्षक योगिनी ठाकुर, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी आदी अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.