कोळसा खाण विस्तारीकरणाला विरोध; वन्यप्रेमी आक्रमक

चंद्रपूर : चंद्रपूर शहरानजीक दुर्गापूर खुली खाण गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आधीच या खाणीमुळे जल, जंगल आणि वाघाचा अधिवास कमी होत असून, येथे वन्यजीव मानव संघर्ष सुरू आहे. आता केंद्र आणि राज्य सरकारने पुन्हा 121.58 हेक्टर जंगलाची जमीन कोळसा खाणीसाठी दिली आहे. या विस्तारिकरणाला विरोध करण्यासाठी चंद्रपूर येथील वन्यजीव संस्था आणि वन्यप्रेमींनी ताडोबा बचाव समितीची स्थापना केली असून आज, 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सकाळी 8.30 वाजता या विरोधात प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करण्यात आले.

या खाणीच्या परिसरात किमान 8 ते 10 वाघ आणि असंख्य वन्यजीव आहेत. या विस्तारिकरणात 121.58 हेक्टर जंगल कापल्या जाणार असून, त्यात 13457 वृक्ष आणि 64349 बांबू कोळशासाठी तोडल्या जाणार आहेत. खाणीसाठी लागणार्‍या बहुतेक मंजुरी वन विभागाने राज्य आणि केंद्र शासनाने दिल्या आहेत. महाराष्ट्रात आधीच अधिकची वीज तयार होत असताना आणि शासनाचे ग्रीन ऊर्जेचे धोरण असताना कोळशासाठी जंगल, वाघ, वन्यजीव आणि ताडोबाचे जंगल देणे योग्य नाही. या खाणीमुळे ताडोबाचे जंगल आणि वाघाचा भ्रमणमार्ग धोक्यात येत असल्यामुळे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त प्रत्यक्ष कोळसा खाणीच्या परिसरात जाऊन विरोध दर्शविण्याचे आंदोलन ‘ताडोबा बचाव समितीने आयोजित केले होते.

5 जून रोजी सकाळी 8.30 वाजता चंद्रपूर मधील विविध पर्यावरण विषयक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्थांची प्रतिनिधी सिनाळा येथे प्रस्तावित खाण क्षेत्रात एकत्र येऊन हा विरोध दर्शविला. याच वर्षी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन्यजीवांनी, विशेषतः वाघांनी 52 व्यक्तींचा बळी घेतला आहे. परंतु, ही कोळसा खाण आल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील हा संघर्ष आणखी शिगेला पोहचेल. शेतकरी, आदिवासी जंगलात मारले जातील, अशी भीतीही पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. आंदोलनात वन्यजीव प्रेमी संस्था इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे, सुरेश चोपणे, योगेश दूधपचारे, यांच्यासह शहरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.