महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

 पुरस्कारासाठी 15 ऑगस्टपर्यंत इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर : शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2020-21,2021-22,2022-23 व 2023-24 या वर्षाकरीता सदर पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती व संस्थांकडून पुरस्कारासाठीचे प्रस्ताव दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करावे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दिपक बानाईत यांनी कळविले आहे.

असे असेल पुरस्काराचे स्वरूप व अहर्ता:

राज्यस्तरीय पुरस्कार : रुपये 1,00,001/- रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. तसेच महिला व बालविकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याच्या 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही.

विभागीय पुरस्कार रुपये 25,001/- रोख स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 7 वर्ष कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलितमित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी तसेच तिचे कार्य व सेवा ही पक्षातील व राजकारणापासून अलिप्त असावी.

जिल्हास्तरीय पुरस्कार : रुपये 10,001/- रोख, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून महिला व बालविकास क्षेत्रात किमान 10 वर्ष सामाजिक कार्य असावे. ज्या महिलांना दलितमित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई पुरस्कार मिळालेला आहे, त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.

अहर्ता पात्र व्यक्ती व संस्थांना संबंधित कागदपत्रे व प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक:

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी : चारित्र्य चांगले असल्याबाबत, त्यांच्याविरुद्ध कोणताही फौजदारी तसेच त्यांनी सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे विभागीय पोलीस अधीक्षकांचे प्रमाणपत्र, प्रस्ताव धारकांची माहिती तसेच केलेल्या कार्याचा तपशील, वृत्तपत्र फोटोग्राफ्स, सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहे? तसेच यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे काय ? याबाबतचा तपशीलासह सदर प्रस्ताव 3 प्रतीत सादर करावा.

विभागीय स्तर पुरस्कारासाठी : संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल, वृत्तपत्र फोटोग्राफ्स, सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहे? तसेच यापूर्वी संस्थेस पुरस्कार मिळाला आहे काय ?  याबाबतचा तपशील, संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत, तसेच संस्थेचे पदाधिकाऱ्यांचे चारित्र्य चांगले आहे, त्यांच्याविरुद्ध कोणताही फौजदारी तसेच त्यांनी सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे व संस्थेचे कार्य व संस्था राजकारणापासून अलिप्त असल्याचे विभागीय पोलीस अधीक्षकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. सदर प्रस्ताव तीन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.

इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जुना कलेक्टर बंगला, आकाशवाणीच्या मागे, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, तसेच आवश्यक कागदपत्रांसह आपला प्रस्ताव 3 प्रतीत 15 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.