‘विशेष मिशन इंद्रधनुष 5.0’ लसीकरण मोहिमेचा लाभ घ्या

चंद्रपूर: बालकामधील मृत्यू  व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. नुकतेच देशात झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, अर्धवट लसिकरण झालेले तसेच लसिकरण न झालेली बालके ही पूर्ण लसिकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात.

केंद्र शासनाने डिसेंबर 2023 पर्यंत गोवर-रुबेला आजाराचे दूरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाने माहे ऑगस्ट 2023 पासून 3 टप्प्यांमध्ये सर्व जिल्हे व महानगरपालिकामध्ये विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 मोहिम राबविण्यात येत आहे.  या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या सर्व बालक व गरोदर माता यांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे.

या मोहिमेदरम्यान जिल्हयातील सर्व ग्रामीण, शहरी व मनपा क्षेत्रातील आशा स्वयंसेविका व ज्या भागात आशा नाही तेथे अंगणवाडी मतदनीस घरोघरी सर्वेक्षण करणार आहेत. यात गरोदर माता तसेच  0 ते 5 वर्षांच्या बालकांची यादी तयार करून लसीकरणापासून वंचित राहिलेल्या गरोदर मातेचे व बालकांचे नियमित लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरण सत्रासोबतच  मिशन इंद्रधनुष 5.0 अंतर्गत विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर मोहिम माहे ऑगस्ट  सप्टेंबर  व  ऑक्टोबर 2023  पर्यंत 3 टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

या मोहिमेदरम्यान ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक बालकाला लसीकरण करून मोहिमेची 100 टक्के उद्दिष्ट पुर्तीचे नियोजन करण्यात येणार आहे. माहे डिसेंबर 2023 पर्यंत गोवर-रूबेला आजाराचे दूरीकरण करण्याचे जिल्हयाचे ध्येय आहे. शासनाने बालकांचे लसीकरण नियमीत वेळेत व्हावे, याकरीता आशाच्या सहकार्याने  लसीकरणासाठी पूर्व नोंदणीकरीता U-WIN ॲप तयार केले आहे. सदर ॲपचा वापर करुन आपल्या बालकांची नोंदणी करुन घ्यावी. नागरीकांनी विशेष मिशन इंद्रधनुष 5.0 लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.