दहावीच्या निकालात मनपाच्या विद्यार्थ्यांना सुयश

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात नागपूर महानगरपालिकेच्या शाळांनी मोठी झेप घेतली आहे. दहावी परीक्षेच्या निकालात नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा मनपात सत्कार करण्यात आला. दहावीत यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीकरिता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृह (स्थायी समिती सभागृह) येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मनपाचे उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त प्रकाश वराडे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख महेश धामेचा, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्यासह मनपाच्या शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मनपा शाळांचे मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.

यावर्षी मनपाच्या शाळांचा निकाल ७९. ६४ टक्के एवढा लागला आहे. यात मराठी माध्यमाचा निकाल ८२. ८३ टक्के तर हिंदी माध्यमाचा निकाल ६९. ८४ टक्के, उर्दू माध्यमाचा निकाल ८३. ७२ टक्के आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल ८४. ०० टक्के लागला आहे. याशिवाय मनपाच्या ७ शाळेंचा निकाल शंभर टक्के लागला असून, ६ शाळा ९० टक्केच्या वर, तर ७ शाळांचा ७५ ते ९० टक्के दरम्यान निकाल लागला आहे. याप्रसंगी उपायुक्त रवींद्र भेलावे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. बारावीच्या परीक्षेत देखील विद्यार्थांनी असेच यश संपादन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर यांनी मनपाच्या निकालाचा आढावा दिला.

कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा तुळशी रोप व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. मनपाच्या मराठी माध्यमातून निर्मल कैलास माटे याने ९०. २० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर हिंदी माध्यमातून सुरेंद्रकुमार चंदु निषाद याने ८४.४० टक्के गुण मिळावीत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. उर्दू मध्यामातून मिसबाह फरहिन अब्दुल हई खान हिने ९३. ४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. इंग्रजी माध्यमातून अल्मीरा समननदीम शेख हिने ८८. ८ हिने गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांमधून स्नेहा पिंपळकर हिने ७७. ६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर निर्मल कैलास माटे याने ९०. २० टक्के गुण मिळवत मागासवर्गीय विद्याविद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

मनपा माध्यमनिहाय प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी

मराठी माध्यम

  • निर्मल कैलास माटे- 90.20%- जयताळा मराठी माध्य. शाळा
  • सुंदरमकुमार मोहन मिश्रा- 88.00%- राममनोहर लोहिया माध्य. शाळा
  • कनिष्का कमलाकर गणवीर – 87.60% – दुर्गानगर माध्य. शाळा