बाळासह मातेच्या सुदृढ आरोग्यासाठी स्तनपान आवश्यक: डॉ. नरेंद्र बहिरवार 

 जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त जनजागृती रॅली

नागपूर : जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त नागपूर महानगरपालिकेच्यावतीने  व ऑबस्ट्रेटिक्स अँन्ड गायनॉकॉलॉजी सोसायटीच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) सकाळी ९ वाजता गांधीनगर स्थित इंदिरा गांधी रुग्णालय ते अभ्यंकर नगर चौक या मार्गावर  ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘स्तनपान बाळासाठी अमृत समान’ हे या रॅलीचे घोषवाक्य होते.

यावेळी  नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, ऑबस्ट्रेटिक्स अँन्ड गायनॉकॉलॉजी सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. सुषमा देशमुख,  इंदिरा गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता बालकोथ (खंडाईत), वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला पुरी,  डॉ. अखिलेश शेवाळे,  डॉ. जयस्वाल, डॉ. वाघमारे, ऑबस्ट्रेटिक्स अँन्ड गायनॅकॉलॉजी सोसायटीच्या  सचिव  डॉ. प्रगती खडतकर,  प्रा. अल्का  शेवाळे यांच्यासह  इंदिरा गांधी रुग्णालयाच्या परिचारिका, आशा सेविका, आकार नर्सिंग होमच्या परिचारिका, सुमनताई नर्सिंग होमच्या  परिचारिका, शुअरटेक नर्सिंग होमच्या परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. परिचारिकांनी इंदिरा गांधी रुग्णालयासमोर ‘स्तनपान’ विषयी जागरूकता निर्माण करणारे पथनाट्य देखील सादर केले.

प्रसूती झाल्यांनतर बाळाला एका तासाच्या आत स्तनपान करणे आवश्यक आहे. बाळ झाल्यांनतर सहा महिने बाळाला आईचेच दूध देण्यात आले पाहिजे हा महत्वाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. बाळाला सहा महिने आईचे दुध दिल्यास बाळाची रोगप्रतिकारक शक्ती  वाढते. आजकालच्या ‘मॉर्डन युगात’ महिला स्तनपान करणे  टाळतात. पण बाळाच्या आरोग्याकरिता आईचे दूध हे खूप महत्वाचे असते. स्तनपानामुळे बाळाला आणि आईला दोघांनाही फायदे होतात. माता आणि बाळ दोघांमधील नाते  घट्ट होते. आईच्या दुधामधून बाळाला व्हिटॅमिन, मिनरल्स मिळत. त्यामुळे हे बाळासाठी ‘बॅलेन्स  डायट’ असत. मातेने  सहा महिने बाळाला स्तनपान केलेच पाहिजे. कोणतेही घुटी किंवा इतर पदार्थ बाळाला देऊ नये, असे मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार म्हणाले.

स्तनपान हे बाळासाठी अमृत समान आहे आणि आईचे दूध मिळणे हा प्रत्येक बाळाचा हक्क आहे.  प्रत्येक आईने बाळाला सहा महिने फक्त स्तनपान करणे आवश्यक आहे आणि नंतर पण दोन वर्ष  इतर आहारासोबत स्तनपान केले पाहिजे. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. स्तनपानाविषयी लोकांमध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे. स्वस्थ नागरिक घडवायचा असल्यास स्तनपान अतिशय महत्वाचे आहे. यामुळे बाळ सुदृढ होते. बाळ आणि आईचे नाते  पुर्ण होते.  त्याचप्रमाणे मातेला होणारे आजार स्तनपान केल्यास पुढील भविष्यात टाळता येऊ शकतात, असे ऑबस्ट्रीक अँन्ड गायनॅकॉलॉजी सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. सुषमा देशमुख यांनी सांगितले.

 या वेळी परिचारिकांकडून इंदिरा गांधी रुग्णालयासमोर पथनाट्य सादर करण्यात आले. बाळाची काळजी कशी घ्यावी, स्तनपानाचे काय महत्व आहे, बाळाला योग्य पद्धतीने कसे स्तनपान केले पाहिजे, महिला गरोदर असतांना कशी काळजी घ्यायला  हवी, स्तनपान करतांना  बाळाला कशा वेगवेगळ्या पद्धतीने धरावे, मातेने स्तन स्वच्छ कसे ठेवावे, बाळाचे लसीकरण कोणत्या महिन्यात करावे, मातेने स्वतःची व बाळाची काळजी कशी घ्यावी या सर्वांविषयी पथनाट्यातून बोध देण्यात आला.   स्तनपान सप्ताह  निमित्याने रांगोळी व पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत शुअरटेक नर्सिंग होमने पहिला क्रमांक, इंदिरा गांधी रुग्णालयाने दुसरा  आणि आकार नर्सिंग होमने तिसरा क्रमांक पटकाविला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अल्का  शेवाळे यांनी केले.