मनपाच्या ‘सायकल एक्स्पोचे’ थाटात उद्घाटन; पहिल्या दिवशी सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर : नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ साकारत असतांना पर्यावरणात कार्बनचे उत्सर्जन कमी व्हावे आणि नागरिकांचे स्वास्थ्य देखील सुदृढ राहावे या उद्देशाने ‘जागतिक सायकल दिनाचे’ औचित्यसाधून येत्या ३ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजता नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील सायकलपटूंच्या सहकार्याने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या अनुषंगाने यशवंत स्टेडियम येथे द्विदिवसीय मनपा सायकल एक्स्पोचे आयोजन करण्यात आले.

नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त सुरेश बगळे यांच्या हस्ते गुरुवार (ता. १) रोजी सायकल एक्स्पोचे मोठ्या थाटात उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमात मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, शहराचे बायसिकल मेअर डॉ. अमित समर्थ, क्रीडा विभागाचे नियंत्रक अधिकारी नितीन भोळे, दिलीप वाघळकर, जेडी स्पोर्ट्स फाउंडेशन जयंत दुबळे यांच्यासह मनपाचे अधिकारी व संख्येत सायकलप्रेमी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना उपायुक्त सुरेश बगळे यांनी सांगितले की, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात या भव्य सायकल एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. एक्स्पोमध्ये विविध प्रकारच्या सायकल नागरिकांना बघायला मिळणार आहेत. याशिवाय नागरिकांना सायकलचे फायदे आणि सायकल चालविल्याने स्वास्थ्य कसे सुदृढ राहील याचे समुपदेशन देखील केले जात आहे. तरी नागरिकांनी अधिकाधिक संख्येत एक्स्पोला भेट द्यावी असे आवाहन उपायुक्त  सुरेश बगळे यांनी केले. तर शहराचे बायसिकल मेअर डॉ. अमित समर्थ यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे सायकलचे एक्स्पो आयोजित केल्या जात असल्याने नागपुरातील सायकल प्रेमींना एक उत्तम अनुभव मिळणार असल्याचे सांगितले. सायकल हे भविष्याचे वाहन असून, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यासाठी उत्तम वाहन असल्याचे डॉ. समर्थ यांनी सांगितले. नागरिकांनी सायकलचा वापर दैनंदिन जीवनात लहान सहन गोष्टी करण्यासाठी करावा तसेच वाहन कुठलेही असो हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

सर्वप्रथम एक्स्पोचे फीत कापून उद्घाटन केले. नंतर मान्यवरांनी एक्स्पोत लावण्यात आलेल्या विविध सायकल दालनांना भेट दिली. सकाळी ७.३० वाजतापासूनच सायकलप्रेमींनी एक्स्पोला भेट देण्याची सुरुवात केली. अत्याधुनिक सायकल बघण्यासाठी सायकलप्रेमींची प्रवीण सायकल स्टोर, भाग्यश्री ट्रेडिंग कंपनी, गियर हेड मोटार, चीप सायकल स्टोर, नरेशचंद्र अँड कंपनी यांच्या प्रत्येक दालनात प्रचंड गर्दी दिसून आली. याशिवाय एक्स्पोमध्ये ऑनलाईन नोंदणी केलेल्या स्पर्धकांना टी-शर्ट प्रदान करण्यात आले. आकर्षक टी-शर्ट घेण्यासाठी स्पर्धकांची रेलचेल बघायला मिळाली. एक्सपोत दर्शनीय ठिकाणी आकर्षक सायकल ठेवण्यात आली असून, या सायकलने भेट देणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.

एक्स्पोला भेट देणाऱ्या ८५ वर्षीय तानाजीराव शिंदे यांनी सांगितले की, ते मागील १० वर्षांपासून नियमितपणे सायकल चालवित आहेत. मनपाने सायकल एक्स्पो आणि सायकल रॅलीचे आयोजन केल्यामुळे अनेकांना नव्याने सायकल चालविण्याची प्रेरणा मिळेल यात काही शंका नाही. पर्यावरणासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी नागरिकांनी सायकलचा वापर दैनंदिन जीवनात करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर विद्यार्थी अभिलाषा वाघमारे आणि कृतिका तलावे यांनी एक्स्पो मध्ये कधी न बघितलेल्या अत्याधुनिक सायकल बघितल्याचा आनंद व्यक्त केला.

‘वॉल ऑफ फेम’ ठरले आकर्षणाचे केंद्र

एक्स्पोच्या प्रवेश द्वारातून आत येत असताना सायकलद्वारे भ्रमंती करणाऱ्या शहरातील विविध सायकलपटूंचे भित्तीचित्र लावण्यात आले आहे. ही ‘वॉल ऑफ फेम’ येणाऱ्या प्रत्येकासाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. यात ज्येष्ठ सायकलपटू ते चिमुकल्या सायकल चालकांचे चित्र तसेच विविध जनजागृतीपर संदेश देण्यासाठी सायकलद्वारे देशभरात फिरणाऱ्या सायकलपटूंचे चित्र लावण्यात आले आहेत. याद्वारे नागरिकांना सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नोंदणीला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

३ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजता नागपूर महानगरपालिका मुख्यालय, सिव्हिल लाईन्स येथून सुरू होणा-या १६ किमीच्या सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाईन नोंदणीला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी मनपाच्या अधिकृत www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरील ‘World Bicycle Day Rally Registration Form’ यावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून नि:शुल्क नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणी झालेल्या सहभागींना मनपातर्फे टी-शर्ट आकर्षक देण्यात येत आहे.

दोघांना सायकल जिंकण्याची संधी

यशवंत स्टेडियम येथे आयोजित सायकल एक्स्पोमध्ये सहभागी होणा-यांकरिता विशेष लकी ड्रॉ काढण्यात येत आहे. लकी ड्रॉ मधील दोन भाग्यवंतांना ‘चीप सायकल स्टोर’ द्वारे दोन गँग व्हीएक्स सायकल जिंकण्याची संधी मिळणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येत एक्स्पोला भेट द्यावी असे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.