मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी सेवानिवृत्त

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतून बुधवार (ता. ३१) रोजी मनपा येथून सेवानिवृत्त झाले. यावेळी आपल्या कार्यशैलीने त्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांची मने जिंकली. सेवानिवृत्ती मुळे पुढील कार्यकाळात अशा अधिकाऱ्यांची अनुपस्थिती महानगरपालिकेला नक्कीच जाणवेल, असे प्रतिपादन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले. बुधवारी मनपा सवेतुन 21 अधिकारी कर्मचारी निवृत्त़ झाले. सर्वांचे शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी.यांच्या हस्ते अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राम जोशी यांच्या पत्नी रंजना जोशी, मनपाचे मुख्य अभियंता राजू गायकवाड, उपायुक्त प्रकाश वराडे, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त सुरेश बगळे, उपायुक्त डॉ. मिलिंद मेश्राम, निगम सचिव रंजना लाड, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक महेश धामेचा, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष अंबुलकर, सहायक आयुक्त गणेश राठोड, सौ. किरण बगडे, सहायक आयुक्त श्री. विजय हुमने, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी श्री. विजय जोशी, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, माजी नगरसेवक नरेंद्र(बाल्या) बोरकर, विजय झलके, नागपूर@२०२५ चे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्हार देशपांडे यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, अधिकारी, कर्मचारी उपद्रव शोध पथकाचे जवान प्रामुख्याने उपस्थित होते.

मनपाच्या सर्व अधिकाऱ्यांच्यावतीने आयुक्त राधाकृष्णन बी यांनी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांचा निवृत्तीपर सत्कार केला. यावेळी आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. म्हणाले की, राम जोशी यांनी जवळपास ३२ वर्ष आपली सेवा प्रशासनाला दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून ते मनपात कार्यरत असून, त्याच्या निवृत्तीमुळे एक कौशल्यपूर्ण अधिकारी मनपातुन जात आहे. कोरोना काळात त्यांनी आपल्या कार्यकौशल्याचे प्रमाण सर्वांनाच दाखवून दिले आहे. शहरातील आरोग्य व्यवस्थेला बाळ देण्याचे कार्य त्यांनी कोरोना दरम्यान केले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच एक स्मितहास्य राहिले आहे. त्यांना मी कधीच तणावात बघितलं नाही, निवृत्तीच्या वयात देखील त्यांच्यातील नवीन काही शिकण्याची वृत्ती ही सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. अधिकाऱ्यांनी ही बाब त्यांच्याकडून शिकायला हवी. ते जरी सेवानिवृत्त झाले असतील तरी ते नागपूरला सुंदर, स्वच्छ आणि स्वस्थ साकारण्यासाठी आपल्याशी नेहमी जुळून राहतील अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.

निवृत्ती प्रसंगी राम जोशी म्हणाले की, आयुक्तांच्या मार्गदर्शनात अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, तसेच आपण ज्या शहरात राहतो, शिक्षण घेतो, त्या शहरासाठी कार्य करण्याची संधी मला प्राप्त झाल्याचा आनंद आहे. प्रशासनाचे कार्य हे लोकाभिमुख कसे होईल याकडे माझे नेहमीच लक्ष राहिले असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमादरम्यान सर्व अधिकाऱ्यांनी राम जोशी त्यांच्या साठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले.

मनपा सवेतुन 21 अधिकारी कर्मचारी निवृत्त़

यापूर्वी महानगरपालिकेच्या सेवामध्ये कार्यरत स्त्री वैद्यकिय अधिकारी श्रीमती भावना सोनकुसरे, कनिष्ठ़ अभियंता  पी.आर. उकेबांते, कनिष्ठ़ अभियंता रमेश हिरामण कोहोड, प्रमुख अग्निशमन विमोचक मनोहर घारपांडे, व इतर कर्मचारी एस.ए. रोठोड, अंनत लक्ष्मनराव देव, मो. अब्दुल कबीर, प्रकाश रामचंद्र गायधने, रमेश दामोधर पडघान, एच.एच. शेलारकर, शकील अहमद अब्दुल मजिद, तुकाराम आनंदराव मेंढे, इंदिरा महिपत गायधने, एकनाथ बालकृष्ण़ पराते, मो. निजामुद्वीन मो. इब्राहिम अंसारी, संजय मधुकर पुंड, चित्रा शंकरराव वाघमारे, वनिता अरुण बम्हे, रेखा हिरामण गजभिये (बागडे), श्रीमती फहमिता अब्दुल लतीफ शेख, श्रीमती अकीला खान शकील अहमद बुधवारी निवृत्त़ झाले. उपायुक्त़ प्रकाश वराडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. गजेन्द्र महल्ले, साप्रवि चे निगम अधिक्षक श्याम कापसे, सहायक अधिक्षक राजकुमार मेश्राम यांनी शॉल श्रीफल देऊन सर्वांचे सत्कार केले.